न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०२४) :- मावळ तालुक्यातील सुदुंबरे गाव परिसरात महावितरणचे कर्मचारी पठाण आणि त्यांचे सहकारी मुख्य लाईन असणाऱ्या खांबालगतची झाडे आणि वेली तोडण्याचे कामे युद्धापातळीवर करीत आहेत. पावसाळ्यात वीज समस्या उद्भवू नये. ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून महावितरणचे कर्मचारी मोठी जोखीम पत्करताना दिसत आहेत.
सर्वांसाठी पावसाळा आवडीचा असला तरी पावसाळ्यातील पाऊस मात्र प्रत्येकाची दैनाच उडवतो. पावसाळ्यात झाडे, वेली यामुळे वीज समस्या उद्भवू शकते. वीज यंत्रणेसाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील एक ओवी तंतोतंत लागू होते. ते म्हणतात ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’.
वीज कर्मचाऱ्यांसाठी मान्सूनचा पाऊस एका युद्धाच्या प्रसंगापेक्षा कमी नाही. दहा-पंधरा मिनिटात आलेल्या पावसामुळे आणि वादळामुळे मोठ-मोठी जुनी झाडे अक्षरश: उन्मळून वीज वाहिन्यांवर पडतात. तारेमुळे दोन्ही बाजुचे पाच-दहा खांब एक झाडं जमीनदोस्त करतं. ते होऊ नये म्हणून महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.











