- नटून थाटून आलेल्या महिलांनी वटवृक्षाला सात वेळा घातल्या प्रदक्षिणा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२४) :- हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच आज शुक्रवारी वटपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी तसेच निरोगी जीवनासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी महिलांनी वटपौर्णिमेचा उपवास केला. वडाच्या झाडाची पूजा केली.

नटून थाटून आलेल्या महिलांनी वटवृक्षाखाली नैवेद्य, प्रसाद आणि फळे अर्पण केली. वडाच्या झाडाला तुपाचा दिवा लावला. महिलांनी वडाच्या झाडाभोवती कच्चा धागा बांधून सात वेळा प्रदक्षिणा घातली. मोठ्यांचा आशीर्वाद घेतले. तसेच मनोभावे व्रत-वैकल्ये करुन पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
वडाच्या झाडाचे धार्मिक महत्त्व…
धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाचे मोठे महत्व सांगितले आहे. हे झाड त्रिमूर्तीचे, सालात विष्णूचे, मुळात ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिवाचे प्रतीक आहे. हे झाड दीर्घकाळ अक्षय राहते, म्हणून त्याला ‘अक्षयवत’ असेही म्हणतात. सौभाग्यवतीचे वरदान मिळण्याबरोबरच आरोग्यासाठीही या वटवृक्षाची पूजा केली जाते. भगवान शिवही वटवृक्षाखाली ध्यानधारणा करत असत. वटवृक्ष अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. देवतेसमान मानले जाणारे वटवृक्ष सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे केंद्र मानले जाते.












