- पक्षश्रेष्ठींपुढे उमेदवारीचा गुंता सोडवण्याचं मोठं आव्हान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जून २०२४) :- पिंपरी चिंचवड शहर भाजपा पिंपरी विधानसभा काबीज करण्याच्या इराद्यात आहे. म्हणूनच तगड्या उमेदवाराला पिंपरीतुन विधानसभेत पाठवण्यासाठी मतदार संघात पक्षश्रेष्ठींकडून चाचपणी सुरु आहे.
शहर भाजपकडून स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव तेजस्विनी कदम, भाजपचे पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे, माजी नगरसेवक शैलेश मोरे आणि माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या नावावर भाजपच्या कोअर कमिटीत खल सुरु असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
भाजपच्या माजी नगरसेविका सीमा सावळे या स्थायी समितीच्या अध्यक्ष असताना पिंपरी मतदारसंघात त्यांनी मोठी कामे केली आहेत. त्यांचा या मतदार संघात दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळे त्याही दावेदार मानल्या जातात.
अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा शहर भाजपचे पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे यांची या मतदार संघावर मजबूत पकड आहे. त्यांनी देखील येथील नागरिकांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. महापालिका, राज्य शासनाकडे त्यांचा विविध विषयांवर पाठपुरावा सुरूच असतो. तसेच ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणूनही ओळखले जातात. त्यामुळे त्यांचीही तयारी जोरात सुरु आहे.
याशिवाय माजी नगरसेवक शैलेश मोरे यांचा येथील आनंदनगर झोपडपट्टी, एम्पायर इस्टेट सोसायटी आणि पिंपरी कॅम्पमधील ना गरिकांमध्ये असलेला सहज वावर यामुळे ते देखील उमेदवारीसाठी दावेदार मानले जातात.
तसेच शांत आणि संयमी स्वभावाचे माजी नगरसेवक विनायक गायकवाड हे देखील ऐनवेळी पिंपरी मतदार संघावर दावा दाखवू शकतात. त्यामुळे पक्षश्रेष्ठी त्यांच्या नावाचा देखील उमेदवारीसाठी विचार करू शकते.
दरम्यान भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव तेजस्विनी कदम यांच नाव पिंपरी विधानसभेसाठी प्रबळ दावेदार म्हणून घेतलं जात आहे. तेजस्विनी कदम या उच्चविद्याभूषित आहेत. विरांगणा सोशल फाऊंडेशन आणि भारतीय जनता युवा मोर्चा शहर युवती अध्यक्ष पदावर असताना त्यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील झोपडपट्टी बहुल भागासह मध्यमवर्गीय भागातील अनेक प्रश्न, समस्या मार्गी लावल्या आहेत. त्यामुळे त्यांचा या मतदार संघावर प्रभाव आहे. दांडगा जनसंपर्कही म्हणता येईल. भाजपा युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहर सरचिटणीस पदावरही त्यांनी काम केले आहे. त्यांच्या कामाची पोच पावती म्हणून 2015-16 मध्ये पक्षाने महाराष्ट्र कामगार मंत्रालयाच्या माध्यमातून त्यांना चित्रपट महामंडळ सदस्य पदावर काम करण्याची संधी दिली होती. तिथेही त्यांनी कामाची चुणूक दाखवून दिली आहे. युवती मोर्चाचे काम करताना मोठ्या संख्येने युवतींना त्यांनी पक्षात सहभागी करून घेतले. भारतीय जनता पार्टीला केंद्रस्थानी ठेवून संघटना बळकट करण्याचे काम त्या करत आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी शक्ती केंद्र प्रमुख म्हणून त्यांचा मतदार संघात पुढाकार होता. त्यामुळे ऐनवेळी पक्ष त्यांना पिंपरी विधानसभेसाठी दावेदार म्हणून पुढे करतील, अशी चर्चा राजकीय जाणकार खाजगीत व्यक्त करीत आहेत.
चिंचवड आणि भोसरी विधानसभेला विभागणारा, तुलनेने सर्वात लहान आणि जुना पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी असा 12 किलोमीटरमध्ये दुतर्फा पसरलेला असा हा पिंपरी विधानसभा मतदारसंघ. मुस्लीम-दलित बहुल, झोपडपट्टी मिश्रित आणि तितकाच स्थानिकांचाही प्रभाव असणारा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी उमेदवारीचा गुंता सोडवण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर असेल.