- शहरातील शैक्षणिक इमारतींना सवलत; स्थायीच्या बैठकीत मान्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जुलै २०२४) :- बालसंगोपन केंद्र, बालवाडी, विनाअनुदानित शाळा, महाविद्यालये आदी संस्थांच्या इमारतींसाठी आवश्यक असणा-या व्यवसाय अग्निसुरक्षा प्रमाणपत्राच्या सेवा शुल्का मध्ये घट करण्यात आली असून ते आता १० रुपयांऐवजी ४ रुपये प्रती चौरस मीटर करण्यात आले आहे. या विषयांसह विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय आज प्रशासक शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी विशेष बैठकीमध्ये ठेवण्यात आले होते. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये पार पडलेल्या या बैठकीमध्ये प्रशासक शेखर सिंह यांनी या विषयांना मंजुरी दिली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, सह आयुक्त तथा नगरसचिव चंद्रकांत इंदलकर तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
महापालिकेच्या वतीने विविध आस्थापनांना व्यवसाय अग्निसुरक्षा प्रमाणपत्र देण्यात येते. त्यासाठी १० रुपये प्रती चौरस मीटर शुल्क आकारण्यात येत होते. दरम्यान, बहुतांश शाळा व संस्थाचालकांनी हे शुल्क अधिक असल्याचे सांगत शुल्क कमी करण्यासाठी महापालिकेकडे विनंती केली होती. त्यानुषंगाने व्यवसाय अग्निसुरक्षा प्रमाणपत्राचे दर कमी करून ४ रुपये प्रती चौरस मीटर करण्यात आले आहे. त्याबाबतच्या विषयाला प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे.
वढू बु. येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमास आर्थिक सहाय्य करण्याच्या विषयाला देखील प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे. त्याद्वारे श्री. छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी ठिकाणी, तुळापुर येथे मंडप व्यवस्था, लाईट व्यवस्था, पिण्याचे पाणी आदी सुविधा दिल्या जाणार आहेत.
कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळास प्रतिबंध करणे तसेच जागरुकता निर्माण करणे यासाठी महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे, महापालिकेच्या वतीने पीएमपीएमएल संस्थेस सन २०२३ -२४ या वर्षातील संचलन तुट अदा करणे तसेच जुनी सांगवी येथील विविध फुटपाथचे व इतर ठिकाणचे पेव्हिंग ब्लॉक बसविणे, से.२३ जलशुद्धीकरण केंद्र येथे २२ केव्ही क्षमतेचे व्ही.सी.बी. बसविणे आणि अनुषंगिक कामे करणे, अ, ब, ड, ग क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत परिसरातील वृक्षांचे महापालिकेच्या हद्दीत पुनर्रोपण करणे, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आरक्षण क्र. ८८ मधील काळेवाडी येथील ज्योतिबा उद्यान येथे ध्यान केंद्र उभारणे आणि आरक्षण क्र.२२२ धनेश्वर मंदिर जवळील बटरफ्लाय ब्रिज जवळ असलेले उद्यान विकसित करणे आदी विषयांच्या अनुषंगाने येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली.