- देहूमध्ये महिलांसाठी मोफत शिवण प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव वार्ताहर (दि. ०९ जुलै २०२४) :- व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन महिलांनी स्वयंरोजगारासाठी सक्षम व्हावे, असे आवाहन मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या पत्नी सारिका शेळके यांनी केले.
‘कुलस्वामिनी महिला मंच, मावळ’ यांच्या वतीने देहू शहरातील महिलांसाठी अन्नपूर्णा बँक्वेट हॉल येथे आयोजित केलेल्या मोफत आरी वर्क आणि शिवणकला प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन सारिका शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमास देहूच्या नगराध्यक्षा पूजा दिवटे, माजी नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, नगरसेविका रसिका काळोखे, पौर्णिमा परदेशी, पूनम काळोखे, सपना मोरे, पूजा काळोखे, प्रियंका मोरे, ज्योती टिळेकर, उपनगराध्यक्ष मयूर शिवशरण, नगरसेवक योगेश काळोखे, प्रवीण काळोखे, योगेश परंडवाल, आदित्य टिळेकर, प्रदीप परंडवाल, सुर्दशन काळोखे, स्वप्निल काळोखे, मयूर गायकवाड, प्रणव काळोखे, रुपेश सोनुने आदी मान्यवर उपस्थित होते.
सारिका शेळके म्हणाल्या की, आज महिला प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत. महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. या प्रशिक्षणाचा महिलांना लाभ होणार असून त्या सक्षम होतील यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील. महिलांनी देखील या प्रशिक्षण वर्गामधून कलाकौशल्य अवगत करावे आणि स्वयंरोजगारासाठी सक्षम व्हावे.
देहूमध्ये महिलांसाठी पहिल्यांदाच मोफत व्यावसायिक प्रशिक्षण वर्गाची सुविधा उपलब्ध होणार असल्याने महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.