न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. ३ मे २०१९) :- जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या ३३४ व्या पालखी सोहळ्याला श्री क्षेत्र देहूगाव येथून ज्येष्ठ कृष्ण सप्तमी सोमवारी (दि. २४ जून) प्रस्थानाने प्रारंभ होणार आहे.
२६ जूनला पालखी सोहळा पुण्यात मुक्कामी असेल. ११ जुलैला श्री क्षेत्र पंढरपुरला पोहचणार आहे. हा पालखी सोहळा १६ जुलैला परतीच्या प्रवासाला प्रारंभ होईल. २८ जुलै रोजी सोहळ्याचा देहूच्या मुख्य मंदिरात समारोप होणार आहे.
पालखी सोहळा पंढरीकडे जाताना २९ जून रोजी असणारी (ज्येष्ठ कृष्ण ११) एकादशी यंदा यवत होणार असल्याची, तर ‘प्रदूषण मुक्त हरीत वारी’, ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश जनजागृती करणार असल्याची माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प मधुकर मोरे यांनी पालखी सोहळाप्रमुख ह.भ.प. काशिनाथ मोरे, ह.भ.प. अजित मोरे, ह.भ.प. संजय मोरे, विश्वस्त ह.भ.प विशाल मोरे, ह.भ.प. माणिक मोरे, ह.भ.प. संतोष मोरे यांच्या उपस्थित दिली आहे.
पालखीचा प्रवास
२४ जून रोजी देहूतील मुख्य मंदिरात पालखी प्रस्थान कार्यक्रम होणार आहे. पहिला मुक्काम श्री क्षेत्र देहुगाव येथील इनामदार साहेब वाड्यात होईल. २५ जून आकुर्डी विठ्ठलमंदिर, २६ आणि २७ जून श्री निवडुंगा श्री विठ्ठल मंदिर, नाना पेठ पुणे, २८ जून लोणी काळभोर येथील विठ्ठल मंदिर, २९ जून यवत, ३० जून वरवंड, १ जुलै उंडवडी गवळ्याची, २ जुलै बारामती शारदा विद्यालय, ३ जुलै सणसर, ४ जुलै (बेलवडी गोल रिंगण), निमगाव केतकी, ५ जुलै इंदापूर येथे (गोल रिंगण) इंदापूर, ६ जुलै सराटी, ७ जुलै अकलूज (माने विद्यालय येथे गोल रिंगण), ८ जुलै बोरगाव (माळीनगर येथे उभे रिंगण), ९ जुलै पिराची कुरोली (तोंडले बोंडले येथे धावा), १० जुलै वाखरी तळ (बाजीराव विहिर येथे उभेरिंगण) मुक्काम करणार असून, पालखी सोहळा ११ जुलै रोजी दुपारी एक वाजल्यानंतर पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. रात्री पंढरपूर शहरात श्री संत तुकाराम महाराज मंदिरात मुक्कामी विसावणार आहे. तर १२ जुलैला नगर प्रदक्षिणा करून पालखी १६ जुलै दुपारी एक वाजेपर्यंत पंढरपूर येथे मुक्कामी राहणार आहे. १६ जुलैला दुपारी श्री क्षेत्र पंढरपूरहून परतीच्या प्रवासाला सुरूवात होणार आहे.











