न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. ३ मे २०१९) :- पुणे एक्स्प्रेस वेवर कॅबमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला तळेगाव पोलिसांनी अटक केली. २० ते २६ एप्रिल दरम्यान या टोळीने एक्स्प्रेस वेवर तब्बल १० ते १२ प्रवाशांना लुबाडले होते.
याप्रकरणी पोलिसांनी पप्पू शिवाजी कांबळे, सनी गौतम घाडगे यांना निगडी परिसरातून अटक केली असून, तिसरा आरोपी फरार असल्याचे तळेगाव पोलिसांनी सांगितले आहे.
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रताप खिमाजी भानुशाली आणि त्यांचा भाऊ हे मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मुंबईला जाण्यासाठी हिंजवडी भुजबळ चौक येथे बसची वाट पाहात थांबले होते. तेवढ्यात एका कॅब चालकाने प्रत्येकी ३०० रुपयांमध्ये अंधेरीपर्यंत सोडतो असे सांगितले. लोढा स्कीमच्या पुढे जाताच कॅब चालक व त्याच्या साथीदाराने प्रताप आणि त्यांच्या भावाला चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील पैसे आणि मौल्यवान वस्तू चोरल्या. यानंतर त्यांना मारहाण करून गाडीच्या खाली ढकलून दिले.
प्रताप यांनी तळेगाव पोलिसांकडे याप्रकरणी फिर्याद दिली. त्याप्रमाणे तळेगाव पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. मोबाईलच्या तांत्रिक बाबी तपासण्यात आल्या. या गुन्ह्यातील आरोपी निगडीत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांना सापळा रचून अटक करण्यात आली.











