- पडद्यामागच्या राजकिय हालचालींना वेग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. १० जुलै २०२४) :- विधान परिषदेच्या ११ जागांसाठी येत्या शुक्रवारी १२ जुलैला मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे राजकिय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत महायुतीकडून १ उमेदवार जास्त देण्यात आल्याने राजकीय चुरस वाढली आहे. पक्षीय बलाबल पाहता महायुतीचे ८ उमेदवार या निवडणुकीत सहज जिंकून येऊ शकतात. पण महायुतीकडून ९ जणांना उमेदवारी देण्यात आल्याने या निवडणुकीतला सस्पेन्स वाढला आहे.
विशेष म्हणजे सर्व ९ जागा जिंकून आणणारच असा निर्धार महायुतीच्या नेत्यांचा आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांनी प्रत्येकी एक उमेदवार दिला आहे. या तीनही पक्षांच्या आमदारांची संख्या पाहता त्यांचे प्रत्येकी एक आमदार सहज निवडून येऊ शकतात. पण महायुतीने एक उमेदवार जास्त दिल्याने महाविकास आघाडीतही धाकधूक वाढली आहे. विशेष म्हणजे सर्व ९ उमेदवार जिंकून आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी रणनीती आखल्याची चर्चा आहे.
महायुतीमधील तीन प्रमुख पक्षांच्या अंतर्गत बैठका पार पडल्यानंतर सर्व मतदार आमदारांचे विजयी गणित मांडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक चाली रचल्या आहेत. वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, महायुतीमधील पक्ष, घटक पक्ष आणि समर्थक अपक्ष आमदारांशी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपर्क ठेवून आहेत. महायुतीचे सर्व ९ उमेदवार विजयी करण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीचे निर्णायक मतं त्यानंतर दुसऱ्या आणि तीसऱ्या पसंतीची मतं कशी आणि कोणाला द्यायची याची सांख्यिकी रणनीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवली आहे.












