- नव्या पिढीचीही हवी नवी साथ; शरद पवारांच विजयी संकल्प सभेत प्रतिपादन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०२४) :- पिंपरी-चिंचवड शहराच्या उभारणीत जुन्या-जाणत्या नेत्यांनी योगदान दिले. त्यामध्ये स्थानिकांचा वाटा मोठा होता. त्यामुळे शहराची आणि राज्याची प्रगती होत गेली. मात्र, आता परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे ही प्रगती थांबता कामा नये, ज्यांनी नव्याने राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यांच्यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची शनिवारी (दि. २०) पिंपरीत विजयी संकल्प सभा झाली. त्यावेळी शरद पवार बोलत होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, बजरंग सोनवणे, आमदार रोहित पवार, युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, आझम पानसरे, माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शहराध्यक्ष तुषार कामठे, इम्रान शेख, आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवड म्हणजे छोटी-छोटी गावे होती. नंतर महापालिका झाली. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी या शहराला उद्योगनगरी बनवले. टाटा कंपनी पिपरीत सुरू करावी, यासाठी स्वतः मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी टाटा यांची भेट घेऊन महाराष्ट्रात प्रकल्प सुरू करण्याची विनंती करत एमआयडीसीतील जागा दिली. चव्हाण यांची ही कृती तरुणांना रोजगार देऊन गेली. त्यानंतर एचए, बजाजसारखे मोठे प्रकल्प इथे उभे राहिले अन् या भागात औद्योगिक क्रांती खऱ्या अर्थाने झाली अन् पिंपरीचे नाव जगभरात गेले. या शहराच्या जडणघडणीत अनेक लोकांनी साथ दिली. तशीच साथ येणाऱ्या पिढीनेही द्यावी, अशी अपेक्षा पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, राज्यातून कंपन्या बाहेर जात आहेत. पेपर फुटी प्रकरणे होत आहेत. भव्य महारोजगार मेळावे आयोजित केले, मात्र त्यातून किती जणांना रोजगार मिळाले हे त्यांनाच माहिती. राज्य सरकारने भ्रष्टाचार केले ते लपविण्यासाठी विविध योजना आणल्या जात आहेत. तुरुंगापेक्षा भाजप बरा, असं म्हणण्याची वेळ भाजप सरकारमध्ये विरोधकांवर आली आहे.
रोहित पवार म्हणाले, शहराचा विकास येथील स्थानिक आणि विस्थापितांनी केला. मात्र, काही जण पंगतीतल्या वाढप्यासारखे असूनही मीच स्वयंपाक केल्याचे सांगतात. पिंपरी-चिंचवड शहरात मलिदा गैंग असल्याने निविदा प्रक्रियेत रिंग होत सर्वसामान्य नागरिकांचा पैसा नेत्यांच्या खिशात गेला आहे. पिंपरी, चिंचवड, भोसरी या तिन्ही विधानसभा राष्ट्रवादीला मिळाव्यात, अशी मागणी केली आहे. निवडणुकीत आपले ८५ नगरसेवक असतील, यासाठी आतापासून प्रयत्न करावा लागेल.















