- आ. सुनील शेळकेंनी भावनांना करून दिली मोकळी वाट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ वार्ताहर (दि. २१ जुलै २०२४) :- महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकसंध झाला व साहेब आणि दादा एकत्र आले तर, आम्हाला आनंदच होईल, अशी स्पष्ट भूमिका मांडत, काही महत्त्वाकांक्षी मंडळी हे होऊ देणार नाही, असा आरोपही आमदार सुनील शेळके यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी त्यांचे स्वागत केले व त्यानंतर आगामी काळात साहेब व दादा एकत्र येऊ शकतात, असे वक्तव्य केले. या वक्तव्याला अनुसरून आमदार शेळके यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांचीही भूमिका स्पष्ट केली.
आमदार शेळके म्हणाले, साहेब जुन्नरच्या दौऱ्यावर असताना आमदार बेनके हे त्यांच्या स्वागतासाठी तिथे गेलं, परंतु त्यांच्यात कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही, अशी माहिती मिळाली. तरीही आमदार बेनके म्हणाले त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकसंध झाला तर, आम्हाला नक्कीच आनंद होईल. परंतु, काही महत्त्वाकांक्षी मंडळी ज्यांना स्वतःच हित साध्य करायचंय, महाराष्ट्रात लवकर नेते होऊ पहायचय अशी मंडळी साहेबांना दादांना किंवा गेली ३५ ते ४० वर्षे ज्यांनी साहेबांना साथ दिली अशा नेत्यांना एकत्र येऊ देणार नाही. अजित पवारांवर टीका करणे, त्यांच्या पक्षासाठी, महाराष्ट्रासाठी असलेले योगदान झाकून ठेऊन आम्हीच पक्ष मोठा केलाय किंवा आम्हीच साहेबांचे खरे वारसदार आहोत असं दाखवायचं काम सुरू केलंय त्यांना साहेब व दादांना एकत्र येऊ द्यायच नाही, असा आरोप शेळके यांनी नाव न घेता केला.
साहेब आणि दादा एकत्र आले तर आम्हाला मनापासून आनंदच होईल, राजकारणात काय व्हायचे ते होईल पण मी दादांची साथ कधीच सोडणार नाही. दादांच्या मागे खंबीरपणे उभा राहील? अशी भूमिकाही आमदार शेळके यांनी यावेळी व्यक्त केली.












