न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे २०१९) :- पिंपरीतील महात्मा फुले नगर येथे पाच महिन्याच्या गरोदर महिलेच्या घरावरील दरवाजावर गटाराजवळची जमीन खचून, भिंत पडली. त्यामुळे ये-जा करण्याचा मार्गच बंद झाला. श्वास आतल्या आत गुदमरल्यामुळे महिला अस्वस्थ होऊन किंचाळू लागली.
आजूबाजूच्या नागरिकांना काय करावे, कळेनासे झाले. शेजारच्याच कोणीतरी माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांना घटनेची माहिती दिली. ननावरे यांनी तात्काळ संत तुकाराम नगर अग्निशमन विभागाच्या पथकास पाचारण केले.
पथकाने संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन घराच्या ज्या बाजूला संगीता पोहोचू शकत होत्या, त्या बाजूच्या भिंतीला छिद्र पाडले. त्याद्वारे त्यांना काही मिनिटांमध्ये सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले. संगीता केशवराम निषाद (वय २२) असे सुखरूप सुटका झालेल्या गरोदर महिलेचे नाव आहे.











