- रेनकोट अभावी विद्यार्थ्यांची झाली फरफट….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जुलै २०२४) :- महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे; मात्र ठेकेदारांना पायघड्या घालण्याच्या वृत्तीमुळे तब्बल दीड महिना उलटूनही विद्यार्थ्यांना अद्याप शैक्षणिक साहित्य मिळालेले नाही. त्यामुळे ठेकेदार नेमत शालेय साहित्य पुरवण्याचा हा अनोखा ‘डीबीटी पॅटर्न’ सपशेल फसल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.
महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरवण्यात येते. पूर्वी नगरसेवक, शिक्षण समितीचे सभापती, सदस्य व प्रशासन यांच्या सावळ्या गोंधळामध्ये विद्यार्थ्यांना दोन ते तीन महिन्यांनी शालेय साहित्य मिळत असे. यामध्ये ठेकेदारी फोफावल्याने सरकारच्या निर्देशानुसार थेट लाभ देण्यास सुरुवात केली. गतवर्षी यामध्ये अनेक त्रुटी आढळल्याने यावेळी शिक्षण विभागाने ‘डीबीटी पॅटर्न’ सुरू केला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा थेट लाभ घेण्यासाठी विभागाने ठेकेदारी प्रक्रिया राबवली. मात्र, शालेय साहित्य तपासणीच्या घोळामुळे या प्रक्रियेला उशीर झाला. सुरुवातीला पाठवलेल्या संस्थेने साहित्य अपात्र केल्यानंतर पुन्हा दुसऱ्या संस्थेकडे तपासणीसाठी साहित्य पाठवत मान्यता घेण्यात आली. पुढे निविदा समितीची बैठक, स्थायी समितीची मान्यता, कामाचा आदेश या महापालिकेच्या लालफितीमध्ये अडकल्याने या प्रक्रियेला उशीर झाला.
‘डीबीटी’ अंतर्गत साहित्य देण्यासाठी ठेकेदारांची नियुक्त्ती केली आहे. हे ठेकेदार पाच दिवस शाळांमध्ये स्टॉल लावणार आहेत. पालकांना त्यांच्या मोबाइलवर ‘क्यूआर कोड’ पाठवण्यात येणार आहे. पालकांनी शाळेत जाऊन या स्टॉलवर हा ‘क्यूआर कोड’ दाखवायचा आहे. हा कोड स्कॅन केल्यानंतर पालकांच्या बँक खात्यावर पाठवलेले पैसे थेट ठेकेदारांना मिळणार आहेत. यामुळे पालकांना या पैशांचा परस्पर इतर कामांसाठी वापर करता येणार नसल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. मे. कल्याणी कॉर्पोरेशन, रिअल एंटरप्रायजेस, सनराइज प्रिंटपॅक, श्री वैष्णवी महिला कॉर्पोरेशन, प्रेस्टिज गारमेंटस, क्लासिक जनरल स्टोर, सुपर प्लॅस्टिक कॉर्पोरेशन, हुसेन ट्रेडर्स, नॅशनल ट्रेडर्स, विशाल एंटरप्रायजेस हे ठेकेदार साहित्य पुरवतील.
शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना वह्या, दप्तर, शूज व रेनकोट असे साहित्य दिले जाते. यावर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शहरात पावसाने जोर पकडला आहे; मात्र महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना अद्याप रेनकोट न मिळाल्याने भरपावसात भिजत शाळेत जावे लागत आहे.
शाळांकडून माहिती घेणे व इतर बाबींची पूर्तता करण्यामध्ये काही वेळ गेला. त्यामुळे थोडा उशीर झाला आहे; मात्र येत्या २५ तारखेपासून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप सुरू होणार आहे. त्याला स्थायी समितीची मान्यता घेतली असून, कामाचा आदेश देण्यात आला आहे. त्यानुसार २५ जुलैपासून शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य मिळणार आहे.
– विजयकुमार थोरात, सहायक आयुक्त, शिक्षण विभाग…











