- नागरी सुविधा उभारण्यासाठीचा एकत्रित प्रस्ताव सादर करा..
- उपमुख्यमंत्री अजित पवारांची थेट मुंबईवरून पालिकेला सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जुलै २०२४) :- पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून शहरातील नागरी सुविधा निर्मितीचे योग्य नियोजन व्हावे, यासाठी ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या जमिनीवर प्रस्तावित स्पाईन रस्ता, सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) विकसित करण्यासह त्या जमिनीवर वाढीव नागरी सुविधा उभारण्यासाठीचा एकत्रित प्रस्ताव सादर करावा. त्या जमिनीचा मोबदला पशुसंवर्धन विभागास देऊन महापालिकेने जमीन ताब्यात घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिले.
पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात मंगळवारी (दि. २३) ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या जमिनीवर बांधण्यात येणाऱ्या स्पाईन रस्ता आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्राबाबतच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, ताथवडे परिसरासह पिंपरी-चिंचवड पालिका आणि पुणे महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रात लोकसंख्या वेगाने वाढत आहे. ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या जागेवर महापालिकेमार्फत स्पाईन रस्ता आणि मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
ताथवडे परिसरासह पिंपरी-चिंचवड येथील नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी वाल्हेकरवाडी चौक ते औंध-रावेत रस्त्यावरील डेअरी फार्म चौक ताथवडे पर्यंतचा ४५ मीटर स्पाईन रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. रस्त्याचे काम तातडीने सुरू करणे आवश्यक असल्याने जमीन हस्तांतर प्रक्रिया गतीने पार पाडावी. त्याचप्रमाणे येथील जमिनीवर २० एमएलडी क्षमतेचा मैला- शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
भविष्यात जास्त क्षमतेचा प्रकल्प उभारावयाचा असल्यास मध्यवर्ती ठिकाणी जमीन मिळण्यात अडचणी येतील. त्यामुळे प्रकल्पाच्या भविष्यातील क्षमता- वाढीच्या दृष्टीने अधिकची जमीन संपादित करून घ्यावी. या ठिकाणी स्पाईन रस्ता, उड्डाणपूल, एसटीपी आणि इतर विकासकामांसाठी १३ एकर जागेचा प्रस्ताव आहे. आवश्यकतेनुसार आत्ताच या क्षेत्रफळात वाढ करून नवीन प्रस्ताव पाठवावा. महापालिकेने या जागेच्या वापराचा सविस्तर आराखडा तयार करावा, असे निर्देश पवार यांनी दिले.











