- त्यानंतर निष्कासनाची कारवाई; अतिक्रमण विभागाचा फतवा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जुलै २०२४) :- पीएमआरडीए क्षेत्रात विनापरवाना उभारलेल्या महाकाय अनधिकृत होर्डिंग्ज धारकांना होर्डिंग्ज परवाने घेण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली आहे. होर्डिंग्ज दुर्घटना टाळण्यासाठी येत्या ३० जुलै पर्यंत होर्डिंग्ज परवाना घ्यावा किंवा होर्डिंग्ज चालक मालकांनी स्वतःहून होर्डिंग काढून घ्यावे अन्यथा निष्कासन कारवाई करण्यात येईल. असे आवाहन सहआयुक्त व अतिक्रमण विभागाचे प्रमुख अनिल दौंडे यांनी केले आहे.
पीएमआरडीए च्या हद्दीतील सर्व अनधिकृत होर्डिंग्ज धारकांनी परवानगीसाठी आजतागायत ८५७ प्रस्ताव प्राधिकरणाकडे दाखल केलेले आहेत. तरी उर्वरित होर्डिंग धारकांनी येत्या आठ दिवसात परवानगीकरिता प्रस्ताव दाखल करावेत. तसेच प्राधिकरणाच्या विकास परवनगी विभागाने दाखल केलेल्या प्रस्तवापैकी ४१० प्रस्तावामध्ये त्रुटी असल्याने आवश्यक कागदपत्रे सादर करणेबाबत कळविले असून त्यानुसार या त्रुटी दिलेल्या मुदतीत पूर्ण कराव्यात अन्यथा निष्कासन कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाच्या वतीने सह आयुक्त अनिल दौंडे याच्या अध्यक्षतेखाली कारवाई पथकाने १५ होर्डिंग्जवर आतापर्यंत कारवाई केली असून पुढील कारवाई टाळण्यासाठी ३१ जुलैपर्यंत सर्व धोकादायक होर्डिंग्ज चालक मालकांनी स्वतःहून काढून घ्यावेत; अन्यथा पीएमआरडीएकडून निष्कासित करण्यात येऊन लोखंड जप्त करण्यात येईल, याची नोंद सर्व होर्डिंग धारकांनी घ्यावी. असे कारवाई पथकाचे प्रमुख तहसीलदार सचिन म्हस्के यांनी सांगितले.











