- रहाटणीतील नोकरी मिळाव्यात हजारो तरुणांचा सहभाग; ऑन दी स्पॉट नियुक्ती..
- चिंचवडमधील तरुणांना आर्थिक सक्षम करण्यासाठी पुढाकार घेणार – चंद्रकांत नखाते…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०२४) :- देशातील बेरोजगारी कायमची नष्ट करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्याने बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळत आहे. चंद्रकांत (आण्णा) नखाते यांनी आयोजित केलेला नोकरी मेळावा त्याचाच एक भाग असून तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी त्यांनी शेकडो कंपन्या एका छताखाली आणल्या आहेत. सरकारच्या नोकरी योजनेची अंमलबजावणी रहाटणीतून होत असल्याचा मनस्वी आनंद वाटतो, अशा शब्दांत खासदार श्रीरंग बारणे यांनी नोकरी मेळाव्याचे कौतुक केले.
पिंपरी-चिंचवड महापालिका क्रीडा समितीचे माजी सभापती तथा मा. नगरसेवक चंद्रकांत नखाते यांच्या वतीने 10 हजार तरुणांच्या हाताला काम देण्याचा उद्देश समोर ठेवून रहाटणी येथील कापसे लॉन्स येथे रविवारी (दि. 28) नोकरी मेळावा भरविण्यात आला होता. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते नोकरी मेळाव्याचे थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी पिंपरी-चिंचवड नाट्य परिषदेचे अध्यक्ष तथा मा. नगरसेवक भाऊसाहेब भोईर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्र प्रांत सदस्य हेमंत हाररे, मा. नगरसेवक शत्रुघ्न काटे, नाना काटे, संदीप कस्पटे, सिध्देश्वर बारणे, राजेंद्र गावडे, विनोद नढे, मोरेश्वर शेडगे, शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, चाफेकर स्मारक समितीचे सदस्य रविंद्र नामदे, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राजदादा तापकीर, युवा नेते निलेश तरस, सामाजिक कार्यकर्ते शंकर नढे, माऊली नढे, समस्थ रहाटणी ग्रामस्थ, शुभम चंद्रकांत नखाते युवा मंचचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
चंद्रकांत नखाते म्हणाले, समाजातील बेरोजगारी हटवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सितारामण यांनी नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये स्टार्टअप्समधील गुंतवणूकदार कंपन्यांना युपीए सरकारने लावलेला एंजल टॅक्स रद्द केला आहे. यामुळे उद्योग क्षेत्राला आता मोठ्या प्रमाणात चालणा मिळणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणूक वाढून नोकरीच्या संधी ही उपलब्ध होणार आहेत. अशा कंपन्यांना मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याबरोबरच रिकाम्या हातांना काम देण्याचे कार्य नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. यामध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांना नोकरी मिळणारच आहे. त्याचबरोबर ज्यांनी कधी नोकरी केली नाही, अशा एक कोटी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देऊन पाच हजार मासिक भत्त्यासह 12 महिन्यांची पंतप्रधान इंटर्नशिप करता येणार आहे. त्यामुळे आता कोणीही बेरोजगार राहणार नाही, याची खात्री केंद्र व राज्य सराकरने दिलेली आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
आण्णांच्या सहकार्याने हजारो तरुणांना मिळाली नोकरी…
या नोकरी मेळाव्यात चिंचवड विधानसभा मतदार संघातील सुमारे सात हजार तरुण शैक्षणिक कागदपत्र घेऊन सहभागी झाले होते. तब्बल 5 हजार 774 तरुणांची नोंदणी करण्यात आली. शैक्षणिक अर्हतेनुसार उपलब्ध नोकरी पदासाठी कंपन्यांकडून मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखती झाल्यानंतर निवड झालेल्या तरुणांना त्याचठिकाणी नियुक्ती पत्र देण्यात आले. अशा एकूण 4 हजार 327 तरुणांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विविध पदांसाठी मुलाखती दिल्या. ऑन दी स्पॉट सिलेक्शन असल्यामुळे नोकरीसाठी निवड झालेल्या तरुणांच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहत होता. ज्यांची निवड झाली नाही, अशांना जॉब कार्ड देण्यात आले. त्यामुळे भविष्यात त्यानाही नोकरीची संधी प्राप्त होणार आहे. नोकरीसाठी निवड झालेल्या तरुणांचे चंद्रकांत नखाते यांनी कौतुक करुन पुढील उज्ज्वल आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.











