- सुधारित आयटीआरची कटकट संपणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०२४) :- आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख दि. ३१ जुलै २०२४ आहे. गेल्या वर्षीपर्यंत म्हणजेच विवरणपत्राच्या तपशिलांमध्ये काही चूक झाली असेल, तर करदात्यांकडे एकच उपाय होता. तो म्हणजे सुधारित आयटीआर दाखल करणे.
पण आता आयकर विभागाने ‘डिस्कार्ड आयटीआर’ नावाचा पर्याय आणला आहे. सोप्या भाषेत याला ‘डिलिट आयटीआर’चा पर्यायही म्हणता येईल. त्यानुसार तुम्ही आयटीआर दाखल केला असेल आणि तुम्हाला अचानक लक्षात आले की, काही चूक झाली आहे, तर अशा वेळी डिस्कार्ड आयटीआर या बटणाच्या मदतीने तो नॉन- व्हेरीफाईड आयटीआर हटवता येणार आहे आणि त्याजागी नवीन आयटीआर दाखल करता येईल.
थोडक्यात, व्हेरीफिकेशनपूर्वी दाखल केलेली कागदपत्रे हटविण्याच्या सुविधेमुळे सुधारित फॉर्म पुन्हा भरण्याचा त्रास वाचेल. तुम्ही थेट आयटीआर वेबसाईटवरच हटवू शकता आणि नवीन दाखल करू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही आयटीआर डिलिट केल्यास तोच पुन्हा रिव्हर्स करू शकत नाही. तसेच मागील असत्यापित आयटीआर टाकून दिल्यानंतरच वापरकर्त्यांना नवीन आयटीआर दाखल करण्याची सुविधा मिळेल. व्हेरीफिकेशन होईपर्यंतच ही सुविधा उपलब्ध असेल.
यासाठी सर्वप्रथम वापरकर्त्यांना आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. तुम्ही पेजवर पोहोचताच, वरच्या बाजूला ई-व्हेरीफाय आयटीआर हा पर्याय दिसेल. यामध्ये सर्व तपशील भरल्यानंतर, तुम्ही पुढे गेल्यास तुम्हाला डिस्कार्डचा पर्याय दिसेल. यावर क्लिक करताच तुमचा असत्यापित आयटीआर हटवला जाईल.















