न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मे २०१९) :- मावळ आणि शिरूर मतदारसंघातील सर्व ईव्हीएम मशिन म्हाळुंगे – बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडासंकुलातील बॅटमिंटन हॉलमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी केंद्र व राज्य राखीव दलासह पिंपरी चिंचवड पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिवसातून तीन वेळा बंदोबस्त तपासण्याचा आदेश पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिला आहे.
ईव्हीएम मशिन्सल ‘थ्री लेयर सिक्युरिटी’ देण्यात आली आहे. ईव्हीएम मशिनपासून काही अंतरावर केंद्राच्या राखीव पोलिस दलाच्या २ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. एका तुकडीमध्ये २५ शस्त्रधारी पोलिस आहेत, राज्य राखीव दलाच्याही दोन तुकड्या तैनात आहेत. केंद्र आणि राज्य राखीव पोलिसांनी केलेल्या सुरक्षाकडीच्या बाहेर स्थानिक पोलिस पहारा देत आहेत. यामध्ये १ सहायक पोलिस आयुक्त, २ वरिष्ठ निरीक्षक, ४ सहायक निरीक्षक आणि २०४ पोलिस कर्मचार आहेत.
बंदोबस्ताची तपासणी वरिष्ठ निरीक्षकांच्या मार्फत केली जाणार आहे. त्यासाठी दररोज एका वरिष्ठ निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त पोलिस उपायुक्त नम्रता पाटील आणि सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख दिवसातून एकदा पाहणी करणार आहेत. हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यशवंत गवारी आणि राखीव पोलिस निरीक्षक यांनी दिवसातून दोन वेळा बंदोबस्ताची पाहणी करावयाची आहे.
यामध्ये प्रामुख्याने स्ट्राॅग रूमच्या दरवाजांचे सील, तैनात असलेले कर्मचारी, सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार आहे, तपासणीनंतर व्हिजिट बुकमध्ये नोंद करण्यात येणार आहे. गैरप्रकार आढळ्यास त्याची माहिती अपर पोलिस आयुक्त आणि नियंत्रण कक्षाला देण्यात येणार आहे. तसेच उपायुक्त, सहायक आयुक्त आणि वरिष्ठ निरीक्षकदेखील बंदोबस्त तपासणार आहेत .











