न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मे २०१९) :- लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पिंपरी – चिंचवड शहरात आचारसंहिता भंगाच्या एकूण २१९ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील सर्वाधिक ९२ तक्रारी पिंपरी विधानसभा मतदारसंघात नोंदविल्या गेल्या आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघात शहरातील पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे, तर शिरूर लोकसभा मतदारसंघात भोसरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. निवडणूक आचारसंहिता काळात निवडणूक विभागास ऑनलाइन व ‘सी – व्हिजिल’ या मोबाईल ॲपवर अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. त्याची तातडीने दखल घेऊन निवडणूक विभागाच्या आचारसंहिता कक्ष व भरारी पथकाने कारवाई केली व तक्रारींचे निरसन केले.
मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघांत सर्वाधिक तक्रारी पिंपरी – चिंचवड शहरातून करण्यात आल्या. सी – व्हिजिल’ मोबाईल ॲपचा वापर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात केला. शहरात सर्वाधिक ९२ तक्रारी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून प्राप्त झाल्या. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून ८६ आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातून ४१ तक्रारी आल्या. मावळ विधानसभा मतदारसंघातून ४६ तक्रारी करण्यात आल्या. या सर्व तक्रारीचे निरसन करण्यात आले आहे .











