- आपत्कालीन परिस्थितीची माहिती आणि पीडितांची घेतली भेट..
- पालिका प्रशासनाची उडाली ऐनवेळी धांदल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑगस्ट २०२४) :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अतिवृष्टीच्या अनुषंगाने पाहणीसाठी पिंपरी चिंचवड शहराला आज सोमवारी (दि. ५) रोजी भेट दिली. आपत्कालीन परिस्थितीची माहिती घेतली. सांगवीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी मनपा शाळेत पुरग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडल्या आहेत. त्यावेळी शिंदे यांनी त्यांना मदतीचे आश्वासन दिले.
मुख्यमंत्री शिंदे हे येणार असल्याने परिसरात सकाळपासून तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. तसेच महापालिकेच्या वतीने मार्गावरील रस्त्यांचीही डागडुजी करण्यात आली होती. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी अहिल्यादेवी होळकर शाळेत येऊन पूरग्रस्तांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. अधिकाऱ्यांकडून पूरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पूरग्रस्तांना चादर तसेच अन्य वस्तूंचे वाटप करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांची पावणे एकची वेळ होती. मात्र त्यांना नियोजित वेळेहून अधिक वेळ लागला. त्यामुळे पूरग्रस्तांना या ठिकाणी ताटकळत बसवून ठेवण्यात आले. जुनी सांगवी येथील मुळानगर येथे बंजारा समाजातील नागरिकांची झोपडीवजा घरे आहेत. या नागरिकांना मुळा नदीला आल्याच्या पुराचा फटका बसला आहे. सकाळी दहानंतर पुर ओसरायला सुरूवात झाल्याने नागरिक घरांकडे जाण्यासाठी घाई करू लागले. मात्र, प्रशासनाकडून त्यांना जाण्यास मज्जाव करण्यात आला.
अहिल्यादेवी होळकर प्राथमिक शाळेत निवाऱ्याची सोय करण्यात आली होती. दुपारपर्यंत या नागरिकांना वेळेवर जेवणही पुरविण्यात आले नव्हते. त्यामुळे या लोकांची अवस्था बंदिस्त कैद्याप्रमाणे झाली होती. अखेर एकच्या सुमारास या नागरिकांना वडा पाव देऊन शांत बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
शहरात अतिवृष्टीमुळे पवना धरणातून सातत्याने होणाऱ्या विसर्गामुळे शहरातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीवरील घरांमध्ये तसेच सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या. या स्थळांची पाहणी करून धोकादायक ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या सुमारे १ हजार नागरिकांना रविवारी महापालिकेच्या वतीने निवारा केंद्रांमध्ये तसेच नातेवाईकांच्या घरी स्थलांतरित केले आहे.














