- विविध मागण्यांसाठी १६ ऑगस्टपासून बेमुदत बंदचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑगस्ट २०२४) :- अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायतीशी संबंधित सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक, संगणक परिचालक १६ ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत. तसेच मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर २८ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी राज्य उपाध्यक्ष शशिकांत मोरे, पुणे जिल्हाध्यक्ष सरपंच उज्ज्वला गोकुळे, जिल्हा समन्वयक सरपंच संदीप ढेरंगे, ग्रामरोजगार सेवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विनोद चव्हाण, संगणक परिचालक संघटनेचे राज्य संघटक संतोष कुडले, सचिन जगताप, संदीप पाटील, राजू जंगम, रईस पटेल, शरद बाबर इ. उपस्थित होते. सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार, संगणक परिचालक आदी संघटनेचा या काम बंद आंदोलनात सहभाग असून,
ग्रामपंचायत घटकांच्या प्रमुख मागण्या…
नियमित व सन्मानजनक मानधन, भत्ता मिळावा, सरपंचांना १५ हजार, उपसरपंचांना १० हजार, तर सदस्याला तीन हजार मानधन मिळावे, ग्रामपंचायत संबंधित सर्व घटकांना विमा, पेन्शन, निश्चित वेतन लागू करावे, मुंबईत सरपंच भवनाची स्थापना करावी, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पद एकत्रित करून पंचायत विकास अधिकारी म्हणावे, ग्रामरोजगार सेवकाची नेमणूक पूर्णवेळ करून वेतननिश्चिती करावी, संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या आकृतिबंधात आणावे, यावलकर समितीचा अहवाल त्वरित लागू करावा, संगणक परिचालकांचा भार ग्रामपंचातीऐवजी शासनाने उचलावा, ग्रामपंचायतींना स्वायत्त संस्थेचा अधिकार देऊन विकासकामे करण्याचा अधिकार द्यावा,
‘काम बंद’चा असा होणार परिणाम…
राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतींचे काम बंद होणार. लाडकी बहीण योजना, पीकविमा अर्ज भरण्याचे काम थांबणार. शैक्षणिक कागदपत्रे, दाखले मिळणार नाहीत. गावगाड्याची कामकाज प्रक्रिया ठप्प होणार.
आमदार, खासदार या विषयावर गप्प आहेत. सरपंच, ग्रामसेवक आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा. अन्यथा येत्या विधानसभा निवडणुकीत मोठा परिणाम होणार आहे.
जयंत पाटील, संस्थापक अध्यक्ष, अखिल भारतीय सरपंच परिषद…















