न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑगस्ट २०२४) :- देशाच्या क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री खासदार रक्षा खडसे एका कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड शहरात आल्या होत्या. प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची आकुर्डी येथे भेट घेतली.
यावेळी समिती राज्य अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील, समिती विभागीय प्रमुख विशाल शेवाळे, संतोष चव्हाण, धीरज नारखेडे, विभावरी इंगळे, गौरी सरोदे, उद्योजक मिलिद चौधरी, प्रफुल्ल पाचपांडे उपस्थित होते.
नागरी सुरक्षेचा देशातील घटता आलेख आणि माहिती अधिकार संदर्भात प्रशासकीय अनास्था यामुळे लाखो अर्ज सरकारी दफ्तरी लाल फितीच्या कारभारात अडकलेले आहेत. याकरिता प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीने भेटीत प्रश्न उपस्थित केले.
बोलताना रक्षा खडसे म्हणाल्या, “आपल्या देशात युवाशक्ती जगात सर्वात जास्त असून योग्य दिशा युवकांना मिळाली तर जगात भारत लवकरच महाशक्ती म्हणून उदयास येईल. आपल्या संस्थेचे विस्तृत निवेदन आपण दिले तर त्यावर नक्कीच सरकार विचार करेल.”
डॉ. विजयकुमार पाटील म्हणाले,” देशातील युवकांच्या बेरोजगारीचा आलेख चिंता वाढवणारा आहे.त्याचप्रमाणे हिंजवडी आय टी क्षेत्रात मधील अनेक कंपन्या नोकरकपात करत असल्याने अनेक युवकांचे भविष्य अंधारमय होत आहे. पिंपरी चिंचवड शहर हे कामगार नगरी म्हणून सर्वश्रुत आहे. परंतु अनेक कंपन्यांचे स्थलांतर व कामगार कपातीमुळे युवकांनपुढे बेरोजगारीचे संकट आ वासून उभे आहे. याकरिता देशातील सरकारने विशेष युवक कल्याण योजना राबविणे आवश्यक आहे. लोकसभेत याकरिता नागरी सुरक्षा प्रश्न उपस्थित होणे आवश्यक आहे.


















