न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑगस्ट २०२४) :- महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत यंदा आठ ते दहा दिवस लवकरच घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च, तर दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षांच्या तारखांबाबत हरकती, सूचना मांडण्यासाठी २३ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी संभाव्य वेळापत्रक प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले. राज्य मंडळाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार बारावीची तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत, लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या दरम्यान घेण्यात येणार आहे.
तर दहावीची तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा ३ ते २० फेब्रुवारी या कालावधीत आणि लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या दरम्यान घेण्याचे नियोजन आहे. तारखांवरील हरकती, सूचना secretary.stateboard@gmail.com या संकेतस्थळावर पाठवण्याबाबत राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.















