न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑगस्ट २०२४) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अ क्षेत्रीय कार्यालयातील लिफ्ट सोमवारी सकाळी अचानक बंद पडली. घटनेचे गांभीर्य ओळखून सुरक्षा रक्षकांनी तत्काळ धाव घेत अडकलेल्या चार नागरिकांची दहा मिनिटांनंतर सुटका केली.
निगडी प्राधिकरणातील भेळ चौकात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ‘अ’ क्षेत्रिय कार्यालय आहे. कार्यालयात सोमवारी जनसंवाद सभा होती. त्यामुळे सभेसाठी काही नागरिक आले होते. वरच्या मजल्यावर चार जण लिफ्टने जात असताना अचानक वीजपुरवठा खंडित झाला. जनरेटर सुरू होण्यास काही कालावधी लागल्याने लिफ्टमधील नागरिक घाबरून गेले. मात्र, बॅकअप असतानाही लिफ्ट जवळच्या मजल्यावर थांबली नाही. वजन जास्त असल्याने लिफ्ट थेट खाली आली. याबाबत सुरक्षा रक्षकांनी तत्काळ धाव घेतली. त्यानंतर १० मिनिटांनी नागरिकांची महापालिकेने सुटका केली.
क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात विविध कामांसाठी नागरिक येत असतात. त्यामुळे येथील लिफ्टची नियमीत देखभाल दुरुस्ती होणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.
प्रभाग कार्यालयात अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने लिफ्टमध्ये चार जण अडकले होते. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. मात्र, नागरिकांची दहा मिनिटांच्या आत सुटका करण्यात आली आहे.
– सुचेता पानसरे, क्षेत्रीय अधिकारी…














