- पीसीयु मध्ये अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ‘दीक्षारंभ’ सोहळा उत्साहात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑगस्ट २०२४) :- शैक्षणिक प्रवासात कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही आयुष्याचा भक्कम पाया तयार करण्यासाठी शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे शिक्षण घेताना अनंत अडचणी आव्हाने आपल्यासमोर येतात या आव्हानांना जिद्द चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सामोरे जा हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
पिंपरी चिंचवड विद्यापीठातील (पीसीयु) उपलब्ध संसाधनांचा आणि संधींचा पुरेपूर वापर करण्याचे आवाहन पाटील यांनी केले. पीसीयु येथील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शाखेचा २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे स्वागत ‘दीक्षारंभ – २०२४-२५’ या कार्यक्रमाव्दारे उत्साहात करण्यात आले. यावेळी ॲटलस कॉप्को इंडियाचे मानव संसाधन विभाग प्रमुख कबीर गायकवाड, पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्रभारी कुलगुरू डॉ. मणीमाला पुरी, प्र कुलगुरू डॉ. सुदीप डी. थेपाडे, स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. आर. जी. बिरादार, पीसीयु नियामक मंडळ सदस्य सचिन इटकर, व्यवस्थापन प्रतिनिधी अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे तसेच स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
आजच्या वेगवान जगात अनुकूलता आणि सतत शिकण्याचे महत्त्व, विद्यार्थ्यांना जिज्ञासू आणि मुक्त मनाने राहण्याचे आवाहन, कबीर गायकवाड यांनी केले. विद्यार्थ्यांना मजबूत नेटवर्क तयार करण्यासाठी आणि त्यांची वैयक्तिक आणि व्यावसायिक वृध्दी वाढवण्यासाठी गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी चिकाटी, नाविन्य आणि शिक्षणात उत्कृष्टतेचा पाठपुरावा करण्याची गरज आहे. आपल्या देशाचे भविष्य घडवण्यात तरुणांची भूमिका महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित क्षेत्रात नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले. पिंपरी चिंचवड विद्यापीठाबाबतचे व्हिजन सांगितले. सर्वांनी पीसीयु शैक्षणिक उत्कृष्टतेचे केंद्र बनवण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन पाटील यांनी केले.
पीसीयु मध्ये असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो जिथे विद्यार्थ्यांना दर्जेदार आधुनिक तंत्रज्ञान अभ्यासण्याची संधी देऊन शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहन दिले जाते. त्याचबरोबर त्यांचे नेतृत्व कौशल्य आणि नैतिक मूल्ये देखील जोपासली जातात, असे डॉ. मणीमाला पुरी यांनी सांगितले.
पीसीयु मधील विद्यार्थ्यांचा वेळ त्यांचे भविष्य घडवण्याची आणि समाजासाठी चिरस्थायी योगदान देण्याची अनोखी संधी आहे. पीसीयु मधील शैक्षणिक, क्रीडा विषयक वातावरण, अभ्यासक्रम, तज्ज्ञांचे मार्गदर्शन या विषयी डॉ. सुदीप थेपडे यांनी माहिती दिली.
दीक्षारंभ सोहळा हा केवळ स्वागतच नव्हे तर विद्यार्थ्यांसाठी आव्हाने आणि संधींचा उत्कटतेने आणि दृढनिश्चयाने स्वीकार करण्यासाठी कृती करण्याचे आवाहन आहे. विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी, नवनवीन शोध घेण्यासाठी आणि त्यांच्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा उपयोग करून समाजासाठी योगदान देण्यास तज्ज्ञांनी प्रोत्साहित केले. या नवीन अध्यायाला सुरुवात करताना, विद्यार्थ्यांनी पीसीयु मध्ये उभारलेला शैक्षणिक पाया केवळ त्यांच्या पुढील आयुष्याला आकार देणार नाही तर जगावर कायमस्वरूपी प्रभाव टाकण्यासाठी सक्षम करेल, असे सचिन इटकर म्हणाले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.