न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑगस्ट २०२४) :- विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबरच्या मध्यात लागू होण्याची शक्यता असताना आता महायुती सरकार महामंडळांवरील नियुक्त्यांच्या मागे लागले आहे. त्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते, नेत्यांचे समाधान करत त्यांना प्रचारात सक्रिय केले जाणार आहे.
जून २०२२ मध्ये शिंदे-फडणवीस सरकार राज्यात आले. तेव्हापासून महामंडळे, समित्यांवरील नियुक्त्या झालेल्या नाहीत. मध्यंतरी भाजप-शिंदेसेना-अजित पवार गट अशा तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांचा आणि प्रमुख नेत्यांचा समावेश असलेली एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली. आ. प्रसाद लाड हे या समितीचे समन्वयक आहेत.
सूत्रांनी सांगितले की, महामंडळांवरील नियुक्तीसाठी भाजपचे नेते, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरु आहे. तिन्ही पक्ष एकत्रित बसून अंतिम निर्णय घेतील. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार आ. प्रसाद लाड यांनी भाजपचे प्रमुख नेते. मंत्री, विभागीय संघटकांशी चर्चा करून काही नावे काढली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बावनकुळे आणि एक-दोन ज्येष्ठ मंत्र्यांची लवकरच बैठक होऊन त्यात नावांना अंतिम स्वरूप दिले जाईल. त्याचप्रमाणे शिंदे सेना आणि अजित पवार गटाकडूनही काही नावे ठरविली जात असल्याची माहिती आहे. तिन्ही पक्षांच्या याद्या तयार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्रितपणे बसून अंतिम निर्णय घेतील. लवकरच निर्णय होईल, असे समजते.











