- विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑगस्ट २०२४) :- शहरातील शाळांमधील स्कूल बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, वाहतुक नियमावलीच्या कठोर अंमलबजावणीसाठी शाळा स्तरावर ‘परिवहन समित्या स्थापन केल्या आहेत. प्रत्येक वर्षी या समितीच्या बैठका घेणे बंधनकारक आहे. मात्र, या वर्षी पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यक्षेत्रात येणाऱ्या केवळ ३२ शाळांमध्येच परिवहन समितीची बैठक झाली आहे. उर्वरित शाळांमध्ये बैठकच झाली नसल्याचे उघड झाले आहे. यावरून शाळा विद्यार्थ्यांच्या वाहतुकीबाबत गंभीर नसल्याचे समोर आले आहे.
पालक विद्यार्थ्यांना शाळेमध्ये ने आण करण्यासाठी खासगी बसचा पर्याय स्वीकारतात. शालेय वाहतूक सुरक्षित व्हावी, या हेतूने शाळा स्तरावर ‘परिवहन समित्या’ स्थापन करण्यात येते. प्रत्येक शाळेमध्ये समिती स्थापन करून बैठक घेण्याची प्रमुख जबाबदारी मुख्याध्यापकांवर असते. या समितीत प्राचार्याच्या अध्यक्षतेखाली, शिक्षक पालकसंघ, वाहतूक निरीक्षक, मोटारवाहन निरीक्षक, बस कंत्राटदार, स्थानिक प्रतिनिधी यांचा समावेश असतो. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वाहनांची कागदपत्रे, नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, वाहन परवाना आदी बाबींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या समितीवर असते.
शहरात सर्व नियम धाब्यावर बसवून शालेय विद्यार्थ्यांची क्षमतेपेक्षा जास्त ने-आण केली जात आहे. शहरात मागील एक महिन्यात शालेय विद्यार्थांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसचे तीन मोठे अपघात झाले आहेत. या अपघातानंतर शालेय वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यक्षेत्रात पिंपरी-चिंचवड शहर भोर, वेल्हे, जुन्नर, मंचर वा तालुक्यांचा समावेश होता. आरटीओ कार्यक्षेत्रात येणाऱ्या ६५० शाळांना आरटीओ कार्यालयाने ई-मेलद्वारे परिवहन समितीची बैठक घेण्याबाबत विनंती केली आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ३२ शाळांनीच परिवहन समितीची बैठक घेऊन त्याचे पत्र आरटीओ कार्यालयाला दिले आहे. अद्याप बहुतांश शाळांमध्ये ‘परिवहन समितीची बैठकच झाली नसल्याचे उघड झाले आहे.
ई-मेलद्वारे परिवहन समितीची बैठक घेण्याचे सांगितले आहे. शाळांनी लवकर बैठक घेऊन परिवहन विभागाला माहिती द्यावी. अन्यथा कडक कारवाई केली जाईल.
-संदेश चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी. पिंपरी-चिंचवड…