न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२४) :- चिंचवड येथील मोहननगर, काळभोरनगर, इंदिरानगर परिसरात वारंवार होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्याच्या समस्येला कंटाळून नागरी हक्क कृती समितीने चिंचवड येथील महावितरण कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढला. त्यानंतर महावितरणला जाग येऊन येथील वीजयंत्रणेच्या सक्षमीकरणाला सुरवात करण्यात आली.
विजेचा आणखी सुरळीत व दर्जेदार पुरवठ्यासाठी महावितरणकडून सुधारित वितरण क्षेत्र योजनेतून (आरडीएसएस) उच्चदाब वीजवाहिन्यांचे विभाजन, नवीन रोहित्र व अस्तित्वात असलेल्या रोहित्रांची क्षमतावाढ, लघुदाब वीजवाहिन्या बदलणे तसेच वीजसुरक्षेसाठी बंच केबल टाकणे आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
या सोबतच जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून चिंचवड स्टेशन येथील ३१५ केव्हीए क्षमतेचे करणे, मोहननगर व अष्टविनायक येथे प्रत्येकी २०० केव्हीएचे एक नवीन रोहित्र उभारणे आणि या भागातील जुन्या लघुदाब वीजवाहिन्या बदलण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत महावितरणने देखभाल व दुरुस्ती अंतर्गत रोहित्रापासून वीजग्राहकांच्या घरांपर्यंत लघुदाबाची १२० मीटर भूमिगत वाहिनी बदलली असून आणखी १२० मीटर बदलण्याचे काम सुरू आहे.
गेल्या २४ ते २५ जुलै दरम्यान आकुर्डी परिसरात पाऊस झाल्याने वीजपुरवठ्यात अडथळे आले होते. यासोबतच महावितरणकडून आतापर्यंत १२५ ग्राहकांचा वीजपुरवठा वीजबिलांच्या सुमारे १० लाख रुपयांच्या थकबाकीमुळे कायमस्वरूपी खंडित करण्यात आला. तसेच अनधिकृत वीजवापरासाठी वापरलेले आकडे वेळोवेळी मोहीम राबवून काढून टाकण्यात आल्याची माहिती महावितरण विभागाने दिली.















