- वेळेत बस न आल्याने तिकीट होतेय अवैध; मग भरावा लागतो भुर्दंड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२४) :- पुणे महानगर परिवहन महामंडळाचे बहुप्रतीक्षित ‘आपली पीएमपीएमएल’ हे अॅप शनिवार (दि. १७) पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले आहे. मोबाइल अॅपवरून प्रवाशांना बसचे लाइव्ह लोकेशनबरोबरच तिकीट आणि पास काढता येत आहे. अॅपच्या तिकिटासाठी प्रवासाची वैध वेळ निश्चित केली आहे. यानंतर तिकीट अवैध होते. मात्र, वाहतूक कोंडीमुळे निर्धारित वेळेत प्रवास पूर्ण न झाल्यास तिकीट अवैध होत असल्यामुळे प्रवाशांची आणि वाहक, तिकीट तपासणीस यांच्यामध्ये तू-तू मैं-मैं होत आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह पीएमआरडीए हद्दीत पीएमपीएमएलकडून सेवा दिली जाते. मुंबईतील बेस्टच्या ‘चलो अॅप’च्या धर्तीवर पुण्यातही मोबाइल अॅप सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. प्रवाशांना घरबसल्या अॅपच्या माध्यमातून बसची रिअल टाइम माहिती मिळावी, यासाठी गेल्या काही वर्षांपासून पीएमपीएमएल प्रशासनाकडून काम सुरू होते. पीएमपीएमएलच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी गुरुवारी (दि.१५) ‘आपली पीएमपीएमएल’ या मोबाइल अॅपचे उद्घाटन करण्यात आले. हे अॅप शनिवारपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुले झाले होते.
मोबाइल अॅप सुरू झाल्यापासून प्रवाशांबरोबरच वाहक आणि तिकीट तपासणीस यांच्यामध्ये पुढे नवीन समस्येला तोंड देत आहेत. प्रवाशांनी अॅपवरून ते असलेल्या ठिकाणावरून इच्छितस्थळी जाण्यासाठी ऑनलाइन पेमेंट करून तिकीट काढल्यावर तिकिटावर तिकीट काढल्याची वेळ आणि तिकिटाची वैधता दाखवली जाते. त्या निश्चित वेळेनंतर तिकीट अवैध होते.
वाहतूक कोंडीमुळे बऱ्याच वेळा पीएमपीएमएलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिटावर असलेल्या वैध वेळेत प्रवास पूर्ण करणे शक्य होत नाही. अशा वेळी अॅपवरून काढलेले तिकीट ठरावीक वेळेनंतर अवैध होते. अशा वेळी तिकीट तपासणीस पकडल्यावर ते तिकीट अवैध असल्याचे सांगून दंड भरायला लावतात, तसेच वाहकाने तिकीट तपासल्यावर तोही तिकीट अवैध असल्याचे सांगून नवीन तिकीट काढण्याचा तगादा लावतात किंवा खाली उतरण्यास सांगतात. अशा वेळी प्रवाशांनी काय करायचे, असा प्रश्न प्रवाशांसमोर उभा राहिला आहे. प्रशासनाने या तांत्रिक त्रुटी दूर करून प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
पीएमपीएमएलच्या मोबाइल अॅपला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. अॅपमध्ये काही त्रुटी असतील तर त्या दूर केल्या जातील.
– नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल…


















