- मृतदेह वायुसेनेच्या विमानाने महाराष्ट्रात आज आणणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काठमांडू/जळगाव (दि. २४ ऑगस्ट २०२४) :- भारतातून नेपाळमध्ये गेलेल्या भाविकांच्या बसला नेपाळमध्ये शुक्रवारी (दि. २३) भीषण अपघात झाला. बस थेट नदीत कोसळली. या बसमध्ये महाराष्ट्रातील भाविकांचा सुद्धा समावेश होता. नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील २४ जणांच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करीत कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे.
या अपघातातील मृतदेह तातडीने महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच केंद्रीय वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. याप्रकरणी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला तात्काळ प्रतिसाद देत वायुसेनेच्या विमानाने आज शनिवारी मृतदेह नाशिक येथे आणण्यात येणार आहेत. तेथून कुटुंबियांकडे ते पोहोचविण्यात येणार आहेत.
नेपाळमध्ये तीर्थयात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील भुसावळ तालुक्यातील प्रवाशांच्या बसला उत्तर काठमांडूकडे (नेपाळ) जात असताना शुक्रवारी भीषण अपघात झाला. उत्तर प्रदेशातील ही खासगी बस लगतच्या मर्स्यांगडी नदीमध्ये कोसळून झालेल्या दुर्घटनेत २६ जण मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे. तर काही गंभीर जखमी झाले आहेत. उत्तरप्रदेशच्या गोरखपूरमधून हे भाविक काठमांडूला चालले होते. पोखरा येथे काही काळ थांबा घेतल्यानंतर ती बस काठमांडूच्या दिशेने निघाली.तनहुन जिल्ह्यात एना पहारा महामार्गावर बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती महामार्गावरून थेट डोंगररांगांमध्ये असलेल्या नदीमध्ये जाऊन कोसळली. या बसमध्ये चालक आणि सहाय्यक चालकासह ४३ प्रवासी होते. मृत्युमुखी पडलेले सर्व भाविक भुसावळ तालुक्यातील वरणगाव- तळवेल परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. जखमींपैकी ५ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेपाळमधील तनहुन जिल्ह्यात शुक्रवारी (दि.२२) सकाळी साडे अकराच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. नेपाळची राजधानी काठमांडूपासून १२० किलोमीटरवर पश्चिमेकडे अबुखैरेनी गावाजवळ हा अपघात घडला. नेपाळमधील जवानांचे मदत पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांना काही भाविकांना वाचविण्यात यश आले असून अन्य बेपत्ता भाविकांचा शोध घेतला जात आहे.