- आरटीओसह बँकेची फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑगस्ट २०२४) :- बनावट कागदपत्रे तयार करून आणि त्यावर खोटे शिक्के मारून कर्जबाजारी मोटारचालकाने पिंपरी- चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) व बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. मोशी प्राधिकरणातील आरटीओ कार्यालयात हा प्रकार घडला.
या प्रकरणी अमोल रतिकांत सद्रे (रा. रास्ता पेठ, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रीतम मोहन शिंदे (रा. साईनगर, मामुर्डी, देहूरोड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपीने त्याच्या मोटारीसाठी स्टेट बँकेचे २०१८ मध्ये कर्ज घेतले होते. मात्र, त्याचे हप्ते न भरल्याने बँकेने त्याची मोटार काळ्या यादीत टाकण्यासाठी आरटीओला पत्र दिले होते. त्यानुसार, आरटीओने ही मोटार काळ्या यादीमध्ये टाकली होती. मात्र, आरोपी शिंदे याने स्टेट बँकेची बनावट कागदपत्रे तयार करून आरटीओच्या अर्ज ३५ वर स्टेट बँकेचे खोटे शिक्के मारून ही मोटार काळ्या यादीमधून कमी करून घेतली.
स्टेट बँकेचा मोटारीवरील बोजा कमी करण्यास लावून प्रादेशिक परिवहन कार्यालय व स्टेट बँक ऑफ इंडियाची फसवणूक केली. या प्रकरणी, भोसरी एमआयडीसी पोलिस अधिक तपास करत आहेत.















