- संयुक्त पाहणीत आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ ऑगस्ट २०२४) :- पुनावळे येथे जाणाऱ्या-येणाऱ्या आयटी अभियंत्यांसह अनेक नागरिकांना खड्ड्यांमुळे आणि रस्त्याच्या दुर्दशेमुळे वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागत आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर उभारण्यात आलेल्या चुकीच्या भुयारी मार्गामुळे आणि रस्त्याच्या बाजूला झालेल्या अतिक्रमणामुळे नेहमीच कोंडीचा अनुभव नागरिकांना येतो. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि आमदार अश्विनी जगताप यांनी संयुक्तपणे पाहणी केली व अधिकाऱ्यांना येथील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त बापू बांगर, अतिरिक्त पोलिस आयुक्त सतीश कसबे, पोलिस निरीक्षक सुनील पिंजन, पोलिस निरीक्षक प्रसाद गोकुळे, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता प्रमोद ओंबासे व नागरिक उपस्थित होते.
पुनावळेमधील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी आमदार अश्विनी जगताप, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी संयुक्त्त पाहणी केली. पुनावळेतील रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशेमुळे आणि वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक कोंडी होत आहे. याबाबत नागरिकांनी आमदार अश्विनी जगताप यांच्याकडे उपाययोजना करण्याबाबत मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर आमदार अश्विनी जगताप यांच्या सूचनेनुसार पुनावळेत ही पाहणी करण्यात आली.
पुनावळे येथील वाहतूककोंडी फोडण्यासाठी येथे झालेले अतिक्रमण तातडीने हटविण्यात येणार आहे. तसेच, सेवा रस्त्याची खड्यांमुळे झालेली दयनीय अवस्था महापालिकेच्या माध्यमातून दुरुस्ती करण्यात येणार आहे. आवश्यक त्याठिकाणी ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूककोंडी सुटणार आहे.
पुनावळे गावचे नागरीकरण वाढल्याने येथे अनेक आयटीयन्स वास्तव्यास आहेत. दिवसेंदिवस येथील लोकसंख्या वाढत आहे. या रस्त्यावर वाहतूककोंडीचे प्रमाण वाढले आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजल्यानंतर या भागातील रस्त्यांवर वाहतूककोंडीचा अनुभव येतो. पाच मिनिटांच्या अंतरासाठी तासनतास खोळंबा होतो. वाहतूक पोलिसांनी नियोजन केले असले, तरी वाहतूक कोंडीचा सामना अभियंत्यांना करावा लागत आहे. पुलाखालून माळवाडी आणि इतर ठिकाणी जावे लागत असल्याने येथील वाहतूककोंडीत आणखी भर पडत आहे.












