न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मे २०१९) :- एक कोटी रुपयांचे सोने, हि-यांचे दागिने व रोख रकमेची चोरी करणा-या तीन सराईत आरोपींना गुन्हे शाखा, युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २५ लाख रुपये किमतीचे ७३१ ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे आणि रोख ११ लाख रुपये किमतीची कार असा एकूण ३६ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
मुस्ताक समशेर खान, राजेंद्र हरिश्चंद्र सोनी (वय 38), इस्माईल बाबू खान (वय 33, दोघे रा. धरमपुरी, जि. धार, मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुध्द हैद्राबाद, मुंबई, पुणे इत्यादी ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उप आयुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक उत्तम तांग यांच्या पथकाने केली.











