न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑगस्ट २०२४) :- पिंपळे गुरव येथील कल्पतरु सोसायटी जवळ, जवळकर नगर येथे (दि. २४) रोजी रात्री ०८.०० वा चे सुमारास गाडीतुन खाली पाण्याची बॉटल घेण्यासाठी महिला उतरली होती. त्यावेळी त्यांचे पाकीट खाली पडले. त्यात सोन्याचे दागिने होते. महिलेच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सांगवी पोलीस ठाणे गाठले. घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली.
कोणतीही निश्चित माहिती नसताना सांगवी पोलीस स्टेशनकडील पोलीस स्टाफने अथकपणे या सोन्याच्या दागिन्यांचा शोध घेतला. त्यांनी रस्त्यावर पडलेले ८० ग्रॅम वजनाचे सोने सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासुन २४ तासात शोधुन काढले आहे.
दरम्यान पोलिसांनी या भागातील सुमारे २० ते २५ सी.सी.टी.व्ही. फुटेजची पडताळणी करुन तपासणी केली. त्यामध्ये एका वाहनामधील इसमाने हे दागिने घेतले असलेचे दिसुन आले. गाडीचा नंबर शोधुन त्याबाबत माहिती घेतली असता सदर गाडी कात्रज येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन सदर इसमाच्या गाडी नंबरवरुन माहिती काढुन गाडी मालकास संपर्क साधला. सोन्याचे दागिने असलेली पर्स मिळाली असल्याची कबुली दिली. सदर ८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने सांगवी पोलीस स्टेशन येथे आणुन पोलिसांनी जमा केले आहेत, अशी माहिती पोलीस उप- आयुक्त परि-१ च्या स्वप्ना गोरे यांनी दिली आहे.