न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑगस्ट २०२४) :- पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत आजच्या तरुण पिढीला प्रबोधन व्हावे, गणेशोत्सव हा आपल्या अस्मितेचा, परंपरेचा आणि संस्कृतीचा ठेवा जतन करता येण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत यंदा प्रथमच मनपा शाळांमध्ये “इको-फ्रेंडली गणेशमूर्ती” ही पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती आणि सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पारंपारिक पद्धतींकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेतर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
गणेशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा होणे ही काळाची गरज आहे. यासाठी प्रत्येकाने आपला दृष्टिकोन पर्यावरणस्नेही ठेवला तरच उत्सव साजरे करण्याबाबत सामाजिक परिवर्तन होऊ शकेल, या उद्देशाने इयत्ता ५ वी ते १० वी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शालेय स्तरावर “इको-फ्रेंडली गणेशमूर्ती” स्पर्धा घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शाश्वत, नैसर्गिकरित्याविघटन होणा-या वस्तू किंवा पुर्नवापरातील साहित्य वापरून गणपतीच्या मूर्ती आणि उत्सवाच्या सजावटीमध्ये सहभाग घेता येणार आहे.
“गणेशमुर्ती तयार करणे” आणि “सजावट” या दोन प्रकारांमध्ये स्पर्धा होईल. त्यात माती, कागद आणि नैसर्गिक तंतू यांसारख्या नैसर्गिक साहित्याचा वापर करून गणपतीच्या मूर्ती तयार करणे आवश्यक आहे. तसेच, सजावट या प्रकारात पुर्नवापरातील साहित्य, नैसर्गिक घटक आणि जैवविघटनशील पदार्थांसह उत्सवाची सजावट आवश्यक आहे. स्पर्धेतील व्यापक सहभाग आणि पर्यावरणपूरक पद्धतींचे पालन करण्यासाठी प्रत्येक सहभागी शाळेत एक इको-
क्लब तयार करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक वर्गात दोन विद्यार्थी हे पर्यावरणपूरक पद्धतींबद्दल जनजागृती करण्यासह मोहीम आणि स्पर्धा यांच्यात समन्वय साधतील.
आरोग्य विभागामार्फत हा उपक्रम राबविण्यात येत असून याबाबत अर्जाची मूदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणपतीच्या मूर्ती आणि सजावट ३ ते ५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत प्रदर्शनासाठी ठेवण्यात येतील. कला शिक्षक, पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिक यांचे एक पॅनेल पर्यावरणास अनुकूल तत्त्वांचे पालन आणि एकूण परिणाम यावर परिक्षण करून इको फ्रेंडली मूर्तीचे मूल्यांकन करतील.
या उपक्रमाबद्दल अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील म्हणाले की, आज आपण पर्यावरणाविषयी अधिक सजग झालो आहोत. त्यामुळे आपले प्रत्येक सण आणि उत्सव हे पर्यावरणपूरक पध्दतीने साजरे होणे आवश्यक आहे. अगदी काही दिवसांवर येउन ठेपलेला गणेशोत्सव सुध्दा पर्यावरणपूरकच असायला हवा, यासाठी पर्यावरणाची काळजी घेऊन विद्यार्थ्यांसाठी लहानपणापासूनच पर्यावरणपूरक सराव करण्याची ही एक अनोखी संधी आहे. हे केवळ मनपा शाळांमध्येच नव्हे तर संपूर्ण समुदायामध्ये भविष्यातील उत्सवांसाठी एक आदर्श ठरेल. ”
आरोग्य विभाग राबवणार जनजागृती मोहीम…
पर्यावरणपूरक शाश्वत पद्धतींबद्दल पर्यावरणपूरक गणपती स्पर्धा २०२४ मध्ये सहभागी होणाऱ्या शाळा आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग ऑन-द- ग्राउंड जनजागृती मोहीम सुरू करत आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जागरुकता मोहिम राबविणा-या संस्थांच्या माध्यमातून गूगल फॉर्म भरून स्पर्धेसाठी नोंदणी केली जात असल्याची माहिती आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे यांनी दिली.
सहभागी शाळांसाठी आवश्यक साधन सामग्री :- मूर्ती तयार करणे : यामध्ये, नैसर्गिक चिकणमाती, बांबू आणि लाकडाचे तुकडे, उसाच्या काड्या, ठोकडे, तुरटीमध्ये मिसळलेली चिकणमाती, मूर्ती रंगविण्यासाठी नैसर्गिक रंग आदी साहित्य आवश्यक आहे.
सजावट या प्रकारात : नालीदार चादरी, कापड, लाकूड, बांबू, नैसर्गिक फुले आणि इतर पुनर्वापर केलेल्या साहित्याचा वापर होणे आवश्यक आहे. तसेच, प्लास्टर ऑफ पॅरिस, एकेरी वापराचे प्लास्टिक, थर्माकोल आणि पुनर्वापर न करता येणाऱ्या वस्तूंचा वापर टाळणे आवश्यक आहे.
“कोणतेही सामाजिक बदल आत्मसात करण्यासाठी वेळ लागतो, पण आपली मानसिकता आपण बदलली तर आपण नक्कीच बदल घडवू शकतो. लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवाचे महत्व आजच्या बदलत्या काळात आणि परिस्थितीतही टिकून आहे. हा उत्सव हा पारंपरिक पद्धतीने साजरा करताना तो पर्यावरणपूरक पद्धतीनेही साजरा करण्याचा आग्रह धरुन, पुढच्या पिढीला नवीन संदेश देण्यासाठी पुढाकार घेवूया.
– शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका…

















