न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑगस्ट २०२४) :- महापालिकेची नुकतीच पर्यावरणपूरक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव २०२४ ची आढावा बैठक स्थायी समितीच्या कै मधुकरराव पवळे सभागृहात पार पडली. बैठकीस आयुक्त शेखर सिंह, पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी तसेच वरिष्ठ अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रमुख उपस्थित होते.
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे पर्यावरण विभागाचे राम सुर्वे, संतोष चव्हाण, तेजस सकट, अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील, पर्यावरण समिती जेष्ठ सदस्य सूर्यकांत मुथीयान यांनी सहभाग नोंदवला.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो. यामध्ये ह्यावर्षी साडे तीन लाख घरगुती गणपती व ३००० सार्वजनिक गणेश मंडळे गणेशोत्सवात सहभागी होण्याची शक्यता आहे. ह्या अनुषंगाने शहरात प्लास्टिक, थर्मोकॉल चा वापर शून्य पातळीवर आणण्याकरिता प्रशासन विशेष मोहीम राबविण्याच्या तयारीत आहे.ह्याच पार्श्वभूमीवर महापालिका पर्यावरण विभागाने आयुक्तांच्या उपस्थितीत शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे नियोजन २७ तारखेस संध्याकाळी ५ ते ६.३० या वेळेत केले.या प्रसंगी त्यांनी त्यांच्या सूचनाही मांडल्या.
या प्रसंगी पर्यावरण अभ्यासक व पी एन एस के एस अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील म्हणाले,” गेल्या चार वर्षाचा पीओपी मूर्ती विक्रीचा आलेख अभ्यासला असता त्यावर थोडा अंकुश लागलेला दिसून आलेला असून पूर्णतः त्यावर नियंत्रण मात्र अद्याप करता आलेले नाही किंबहुना पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचा म्हणावा तेव्हढा पुरवठा अजूनही मूर्ती विक्रेत्यांना करता आलेला नाही. शाडू मातीच्या मूर्तींची किंमत ही पीओपी मूर्तीच्या तुलनेत चार पटीने महागात असले कारणाने सर्वसामान्य कुटुंबीय आजही स्वस्त पीओपी मूर्ती विकत घेताना दिसून येतात. त्यासाठी पीओपी मूर्ती नदीच्या पाण्यापर्यंत न पोहचू देण्याची जबाबदारी आता प्रशासनावर आहे.त्यासाठी पीओपी मूर्ती विघटन हौद प्रत्येक प्रभागात उभे करणे आवश्यक ठरते. सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालनही प्रशासनाने आमलात आणणे महत्वाचे.”
जेष्ठ पर्यावरण अभ्यासक सूर्यकांत मुथीयान म्हणाले,” मूर्ती विसर्जन घाट व तलाव या ठिकाणी नागरिकांना पर्यावरण पूरक मूर्ती विसर्जन बाबत योग्य मार्गदर्शक सूचना देणे आवश्यक त्याचप्रमाणे निर्माल्य कुंड हे सुस्थितीत व नवीन असावे. ज्यामुळे धार्मिक भावनांना ठेच पोहचता निर्माल्य नागरिक त्या कुंडात टाकतील”.
आयुक्त शेखर सिंह यांनी सूचना ऐकून त्यावर योग्य अंमलबजावणी करण्याचे सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सांगितले. अनधिकृत मूर्ती विक्रेते स्टॉल धारक तसेच पीओपी मूर्ती विक्रेते ह्यावर कायदेशीर कारवाई करण्याचेही आदेश सुद्धा बैठकीत देण्यात आले.














