- अधिकाऱ्यांची झाडाझडती; बैठकीत पंधरा कोटींचा निधी देण्याचे आश्वासन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. २९ ऑगस्ट २०२४) :- देहुगाव नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना पाण्याची टंचाई भासू नये याकरिता नवीन पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल, असे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले. देहु नगरपंचायत कार्यालयात रविवारी मुख्याधिकारी, सर्व अधिकारी आणि ठेकेदार यांच्या विविध कामांच्या आढावा बैठकीत आमदार सुनील शेळके बोलत होते.
यावेळी देहू नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, नगराध्यक्षा पूजा दिवटे, उपनगराध्यक्ष मयूर शिवतरण, विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका, ठेकेदार, नगरपंचायतीचे अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी देहूतील विविध विकासकार्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी लवकरच उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन आमदार शेळके यांनी दिले.
गणेशोत्सवापूर्वीच सुरू असलेल्या सर्व रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात यावीत. पदपथावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांकडून बाजार कर वसूल करू नये. कोणत्याही बांधकाम व्यावसायिकाला त्याच्या मंजूर आराखड्यानुसार काम केले असेल तरच भोगवटा प्रमाणपत्र (पूर्णत्वाचा दाखला) द्यावे, अन्यथा प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, अशा सक्त सूचना आमदार सुनील शेळके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
बोडकेवाडी येथील जलउपसा केंद्राला अखंड विद्युत पुरवठा होत नसल्याने गावात सध्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी येत आहेत. त्यावर उपाय म्हणून तातडीने तळवडे परिसरातील एक्सप्रेस फिडर वरून ओव्हर डेड विद्युत पुरवठा तत्काळ घ्यावा, यासाठी तातडीने अंदाजपत्रक तयार करून प्रस्ताव सादर करावा, यासाठी दोन ते तीन कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देखील आमदार शेळके यांनी दिले.
काही ठिकाणच्या कामाच्या दर्जाबाबत तक्रारी बैठकीत आल्या, त्यात पेव्हींग ब्लॉक बदलून मिळावेत, अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्याबाबतीत संबधीत ठेकेदारांनी ब्लॉक बदलून द्यावेत, कामाच्या दर्जामध्ये कोठेही तडजोड करू नये, अशा सूचना आमदार शेळके यांनी दिल्या. यासह गल्लीत जाणारे मुख्य रस्ते प्राधान्याने करावेत, मुख्य रस्ते ८ इंच आणि अंतर्गत रस्ते ६ इंच जाडीचे काँक्रिटचे करावेत, अशीही ताकीद दिली. बोडकेवाडी येथील स्मशानभूमीच्या लांबलेल्या कामाची माहिती घेऊन तेथील काम तत्काळ मार्गी लावून योग्य पध्दतीने आणि आराखड्या प्रमाणेच करावे, असे आमदारांनी सांगितले.
चौक रुंदीकरण, वाढीव करातील हरकती सूचना, फ्लॅटचे ताबा न देणाऱ्या बांधकाम व्यवसायिक संदर्भातील तक्रारी, मनपा हद्दीत जाणाऱ्या पाण्याच्या पाईप लाईनमुळे रस्त्यांची झालेली दुरावस्था, जागा हस्तांतरित नसल्याने रखडलेली रस्त्यांची कामे अशा सर्व तक्रारी ऐकूण घेत त्याचे निराकारण करण्याबाबत सूचना दिल्या.