- अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुखपदी पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांची नियुक्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑगस्ट २०२४) :- पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कार्यालयात दक्षता अधिकारी म्हणून पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांची नेमणूक झाली. त्यासह त्यांच्याकडे आता ‘पीएमआरडीए’च्या अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख म्हणून पदभार दिला आहे. त्यामुळे पोलिस आणि अतिक्रमण निर्मूलन विभागामध्ये समन्वय राहण्यास मदत होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
‘पीएमआरडीए’ कार्यालयातील अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख असलेले सह आयुक्त अनिल दौंडे यांची बदली झाल्याने हे पद रिक्त होते. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथून उपजिल्हाधिकारी म्हणून दीप्ती सूर्यवंशी यांची या ठिकाणी उपायुक्त म्हणून बदली केली होती. त्यांना काही दिवस अतिक्रमण विभागप्रमुख देण्यात आले होते. मात्र, हे पद त्यापेक्षा वरिष्ठ असल्याने नुकतेच रजू झालेले पोलिस अधीक्षक तांबे यांची या ठिकाणी विभागप्रमुख म्हणून नियुक्ती केलेली आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेप्रमाणेच ‘पीएमआरडीए’ हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभारली आहेत. त्यावर कारवाई होताना दिसत नाही. अनधिकृत हॉटेल, पब याविरोधात तीव्र मोहीम ‘पीएमआरडीए’कडून सुरू होती. तसेच आकाशचिन्ह परवाना विभाग अतिक्रमण निर्मूलन विभागाअंतर्गत वर्ग केला होता. त्यामुळे अनधिकृत बांधकामापाठोपाठ अनधिकृत होर्डिंग्जवरील देखील कारवाई थंडावली आहे.
अतिक्रमण निर्मूलन कारवाईसाठी ‘पीएमआरडीए’चा स्वतंत्र पोलिस कक्ष आहे. या ठिकाणी एका पोलिस निरीक्षकामार्फत समन्वय साधला जातो. मात्र, मोठ्या प्रमाणात कारवाई करताना आणि प्रामुख्याने लोकवस्तीत कारवाई करताना अतिरिक्त मनुष्यबळाची गरज असते. त्यामुळे स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त मागवला जातो. आता थेट विभागप्रमुख म्हणून पोलिस अधीक्षक यांच्याकडे पदभार आल्याने पुरेसा पोलिस बंदोबस्त उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडील रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी दीप्ती सूर्यवंशी यांची ‘पीएमआरडीए’मध्ये बदली झाली. गेल्या आठवड्यात त्या ‘पीएमआरडीए’ कार्यालयात रुजू झाल्या. त्यांची उपायुक्त म्हणून अतिक्रमण निर्मूलन विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. या विभागाला अधिकारी मिळाल्याने अनधिकृत बांधकामांवरील कारवाईस वेग मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.