न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ सप्टेंबर २०२४) :- चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रामचे प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन प्रमुख पाहुणे व मुंबईचे व्याख्याते प्रा.आशिष दुबे व कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ.दीपक शहा यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावरती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.अशोक डोंगरे, कमला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.पौर्णिमा कदम, उपप्राचार्या डॉ.वनिता कुर्हाडे, डॉ.सुनिता पटनाईक, प्रा.जस्मिन फरास, प्रा.वैशाली देशपांडे, प्रा.वर्षा निगडे आदी मान्यवर व विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते करण्यात आला व प्रतिभा स्टारडम् या नियतकालिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुंबईचे व्याख्याते प्राध्यापक आशिष दुबे पुढे म्हणाले, जीवनात भविष्यात काय करायचे हे आत्ताच ठरवा. पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांना उद्देशून पुढे म्हणाले कठोर परिश्रमातूनच यश प्राप्त करता येते. कामात, शिक्षणात अपयश आले, तरी खचून जाऊ नका, केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळा. आळस झटकून नंतर करू या प्रवृत्तीला छेद द्या, विषयाला प्राधान्यक्रम देऊन अभ्यासाचे दैनंदिन वेळापत्रक करा. सातत्याने अभ्यासात रमाल तरच परिक्षेत यश प्राप्त कराल याची खूणगाठ मनाशी बांधा. केवळ स्वप्न पाहून यश प्राप्त करता येत नाही, निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्याची कृतीरुपी अंगीकारावे, असे आवाहन यावेळी केले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे म्हणाले, ज्या आई-वडिलांनी आपल्याला मोठे केले त्यांना विसरू नका. भविष्यात काय करायचे हे ठरवून येणार्या आव्हानांना सामोरे जात संघर्षाची तयारी ठेवली तरच ध्येयापर्यंत जाता येईल. हे माझं ते माझं यात गुरफुटून जाऊ नका. या जगात आपण एक विश्वस्त आहोत याची खुणगाठ प्रत्येकाने मनाशी बांधा. मोबाईलमध्ये जास्त न रमता अभ्यासावर जास्त लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.
संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा म्हणाले, चांगल्या मित्रांची संगत वाढवा. भांडणे, रॅगिंग, छेडछाड पासून दूर रहा, विचार करा भावी आयुष्य व भविष्य तुमच्या हातात आहे. आयुष्यात प्रगती व स्वतःची उंची गाठण्यासाठी स्वतःला समृद्ध करणे आवश्यक आहे. महाविद्यालयीन उपक्रमात सहभाग घ्या, सातत्यापूर्ण वाचन, अभ्यास करून आकलन करा. शिक्षणाबरोबरच आवडत्या क्षेत्रातील छंद जोपासा. ध्येयापासून दूर जाऊ नका. या वर्षी संस्था अकरावीच्या मुलींना स्वसंरक्षणासाठी मोफत जुडो कराटेचे प्रशिक्षण देणार आहे. मुलांनी देखील सहभाग घ्यावा, असे आवाहन करून विद्यार्थ्यांनी प्रभोलनापासून तसेच गुटखा, तंबाखू, सिगरेट व्यसनापासून दूर राहा आयुष्य कसे घडवायचे तुमच्या हातात आहे. आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करा. महाविद्यालयात बारावीत सायन्स, कॉर्मस, आर्टस्मध्ये 900 हुन अधीक विद्यार्थी शिक्षण घेत आहे. महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.वनिता कुर्हाडे व त्यांच्या प्राध्यापक वृंदांनी गेली तीन वर्षे बारावीचा निकाल सतत शंभर टक्के लागला. याबाबत विशेष कौतुक केले. हे सोपे नसून त्यासाठी प्राध्यापकांनी प्रचंड कष्ट घेतले. त्याबद्दल सर्वांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, अशा शब्दात डॉ. दीपक शहा यांनी आपल्या मनोगतात आपल्या भावना व्यक्त केल्या.
उपप्राचार्या डॉ.वनिता कुर्हाडे आपल्या प्रस्ताविकात म्हणाल्या, प्रत्येक विद्यार्थी व त्यांच्या पालकांचेे जी स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध आहे. यावेळी डॉ. हर्षिता वाच्छांनी यांच्या विशेष सहकार्याने प्रतिभा महाविद्यालयातील सायबर योध्दांनी ‘क्विक हिल फाउंडेशन’च्या सहाय्याने सुरू असलेल्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा कार्यक्रमांतर्गत जनजागृती’ पर पथनाट्य सादर करून उपस्थितांना शपथ दिली. व्याख्याते आशिष दुबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.अशोक डोंगरे व संस्थापक डॉ.दीपक शहा यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व प्राध्यापकांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी यावेळी विविध मनमोहक सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.रवींद्र निरगुडे, प्रा.सुकन्या बॅनर्जी यांनी केले तर आभार प्रा.वर्षा निगडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी विशेष परिश्रम घेतले.