न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव वार्ताहर (दि. १० सप्टेंबर २०२४) :- यवतमाळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांची तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश नगर विकास विभागाच्या अवर सचिव अ. का. लक्कस यांनी जारी केले आहेत. यापूर्वीही सरनाईक यांनी तळेगाव दाभाडे येथे मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले होते.
वादग्रस्त मुख्याधिकारी एन. के. पाटील यांचे दि. ९ जुलैला निलंबन करण्यात आले. त्यानंतर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदासाठी कोणाची वर्णी लागणार ? याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष लागले होते.
या अगोदरचे नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी एन. के. पाटील यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. त्यामुळे, त्यांना राज्य शासनाने ९ जुलैला निलंबित केले. त्यामुळे, लोणावळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्याकडे जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकारीपदाचा अतिरिक्त प्रभार सोपविला. परंतु, लोणावळा शहराचा कारभार मोठा असल्याने त्यांना केवळ १० ते १२ दिवस तळेगावचा कारभार पाहता आला. सध्या त्यांच्या जागेवर वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम हे प्रभारी म्हणून कामकाज पाहत होते.


















