न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर २०२४) :- प्रवासी वाहतूक करताना झालेल्या ओळखीतून रिक्षाचालकाने महिलेसोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहण्यास सुरुवात केली. दरम्यान, चारित्र्यावर संशय घेऊन तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह रिक्षात ठेवून पळ काढला. थेरगाव येथील जगतापनगर येथे बुधवारी (दि.११) सकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
शिवानी सोमनाथ सुपेकर उर्फ संतोषी लकमीचंद भुंबक (२७, रा. वडगाव मावळ) असे मृत महिलेचे नाव आहे. तिची बहीण शारदा नवीन जोशी (३५, रा. गणेशनगर, बोपखेल) यांनी वाकड पोलिसांत फिर्याद दिली. विनायक अनिल आवळे (३५, रा. एमएम चौकाजवळ, काळेवाडी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित ३५ वर्षीय विनायक विवाहित आहे. मात्र, पत्नी सोबत राहत नसल्याने तो एकटाच राहत होता. त्याच्या मुलाचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले आहे. विनायक रिक्षा चालवतो. फिर्यादी शारदा यांची बहीण शिवानी यांच्या पतीचे निधन झाले आहे. तिला पाच वर्षांचा मुलगा आहे. तो शिवानी यांच्या आईवडिलांकडे राहतो. प्रवासी वाहतूक करत असताना विनायक आवळे याची शिवानीशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर ते ‘लिव्ह इन रिलेशन मध्ये राहत होते. काही दिवसांपासून विनायक शिवानीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. यावरूनच त्याने रात्री गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर रिक्षात मृतदेह ठेवून तिच्या आई व डिलांच्या घरासमोर मृतदेह असलेली रिक्षा सोडून तो फरार झाला.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. संशयिताच्या शोधात स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके रवाना केली आहेत.
















