न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मे २०१९) :- हिंजवडी शेजारच्या मारुंजी गावाला पूर्वीप्रमाणे पोलीस पाटील नेमावा. त्यामुळे गैरधंदे व गुन्हेगारी प्रवृत्तीस आळा बसेल, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अंकुश जगताप यांनी केली आहे.
याबाबत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आर. के. पज्ञनाभन यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पोलीस आणि ग्रामस्थांमधील दुवा पोलीस पाटील असतो. मात्र, ९ वर्षापासून मारुंजीसह हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांसाठी पोलीस पाटील नियुक्तीच रद्द झाली. त्यामुळे पूर्वी सारख्या समंजस माणसाचा अभाव आहे. परिणामी धाक नसल्याने गावात अनेक गैरप्रकार वाढले आहेत.
पोलीस पाटील हे गावातील वाद-विवाद व गावगाडा व सामाजिक वातावरण यावर अंकुश ठेवण्याची भुमिका पार पाडतात. गावात गैरप्रकार गुन्हेगारी घटनाची माहिती वेळीच पोलीस ठाण्यात देत असतात. परिणामी गैरप्रकार व गुन्हेगारी घटनांवर वेळीच नियंत्रण येत होते. मात्र, परिसरातील गावांसाठी हिंजवडी पोलिस ठाणे सुरू झाले. हे शहराशी जोडले असल्याचे कारण देत राज्य शासनाच्या गृह खात्याच्या आदेशानुसार तत्कालीन पुणे पोलीस आयुक्तालयाने पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमधे पोलीस पाटील नियुक्ती करता येत नाही, असे जाहीर केले आहे.
गेल्या ७ वर्षांपासून मारुंजीसह हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांसाठी पोलीस पाटील नियुक्तीची परिक्षा रद्द केली आहे. त्यामुळे गावात पोलीस पाटील नाहीत. गुन्हेगारी कृत्यांना पाठीशी घातले जात असल्याने किंवा त्यातून पैसे कमविण्यच्या प्रकाराने गुन्हेगारी वाढत आहे, असे या निवेदनात जगताप यांनी म्हटले आहे.











