न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२४) :- पिंपळे सौदागरमधील शिवार चौक ते गोविंद गार्डन चौक (कुणाल आयकॉन रोड) रस्त्याला आधुनिक पद्धतीने विकसित करण्यासाठी नुकत्याच झालेल्या स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.
पिंपळे सौदागरमधील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने आणखी एक सकारात्मक पाऊल टाकत ५५ कोटी रुपये मंजूर रकमेसह या प्रकल्पाद्वारे रस्त्यांचे १८ मीटर आणि १२ मीटर रुंदीकरण आणि आधुनिकीकरण करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे.
कुणाल आयकॉन रस्ता हा वाकड ते नाशिक फाटा रोड आणि जुन्या मुंबई-पुणे आणि मुंबई-बेंगळुरू महामार्गांसह प्रमुख मार्गांना जोडतो, ज्यामुळे हा शहरातील एक महत्वाचा मार्ग आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणास आणि आधुनिकीकरणाच्या अंमलबजावणीला लवकरच सुरूवात होणार असून ३० महिन्यांच्या कालावधी मध्ये प्रकल्प पुर्ण करण्यावर महापालिका भर देणार आहे. पिंपळे सौदागर सारख्या वेगाने वाढणाऱ्या निवासी आणि व्यावसायिक क्षेत्रातील प्रचंड वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी यामुळे मदत होणार आहे.
या प्रकल्पामध्ये इतर आवश्यक सेवांबरोबरच पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी नवीन पावसाळी वहन नलिका, जलनिस्सारण वाहिनी, पाणीपुरवठा वाहिनी, पथदिवे आणि दिशादर्शक सूचनाफलक आदी सुविधांचाही समावेश असणार आहे. तसेच प्रकल्पासाठी अर्बन ट्रान्सपोर्ट फंड (युटीएफ) द्वारे निधी उपलब्ध करून दिला जाणार असून महापालिकेच्या नागरी प्रकल्प विभागाच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाचे काम केले जाणार आहे. हा महत्वाकांक्षी प्रकल्प
वाढत्या शहरीकरणाच्या अनुषंगाने पायाभूत सुविधांच्या आव्हानांना तोंड देत पिंपरी चिंचवडला सुनियोजित, आधुनिक शहरामध्ये रूपांतरित करण्याच्या व्यापक दृष्टिकोनाचा एक भाग आहे.
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये –
प्रकल्पाची किंमत :- ५५ कोटी रुपये (प्रशासकीय मान्यता)
निविदा रक्कम :- ४२.४३ कोटी रुपये
निविदा स्विकृती रक्कम :- ३३.६७ कोटी रुपये
प्रकल्पाची मुदत :- ३० महिने
निधी स्त्रोत:- अर्बन ट्रान्सपोर्ट फंड (युटीएफ)
प्रकल्पाची माहिती :-
रस्त्याचे १८ व १२ मीटर रुंदीकरण
पादचाऱ्यांसाठी सोयीस्कर बांधकाम (अर्बन डिझाईननुसार)
नियोजित पार्किंगसाठी स्वतंत्र जागा
पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी वहन नलिका
पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि ओएफसीसाठी स्वतंत्र पाईपलाईन
पथदिवे आणि मार्गदर्शक फलकांची सुविधा
प्रकल्पाचे फायदे:
वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांचा वेळ तसेच इंधनाची होणार बचत
पादचारी किंवा वयोवृद्धांसाठी सोयीस्कर तसेच सुरक्षित पदपथाची सुविधा
इंधनाची बचत झाल्यामुळे पर्यावरणपूरक वातावरण राखण्यास तसेच वायूप्रदूषण कमी करण्यास होणार मदत
शिवार चौक ते गोविंद गार्डन (कुणाल आयकॉन रोड) रस्त्याच्या विकासामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि रहिवाशांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाचा अनुभव घेता येईल. या रस्त्याचे अर्बन डिझाईननुसार आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याने पादचारी, सायकलस्वार तसेच अबालवृद्ध नागरिकांसाठी एक सुरक्षित रस्ता तयार करण्यावर महापालिका भर देणार आहे. नागरिकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन असे पायाभूत सुविधा
प्रकल्प कार्यक्षमतेने पूर्ण करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका…










