न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२४) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील माहिती व जनसंपर्क विभागातील मुख्य लिपीक वसीम कुरेशी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. याबाबत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी शोक व्यक्त केला असून त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली आहे.
वसीम कुरेशी यांचे शुक्रवारी रात्री ११.३० वाजता बाणेर येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांचे वय ५२ वर्षे होते. त्यांच्या पश्चात्त आई, पत्नी आणि मुले असा त्यांचा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर २२ सप्टेंबर रोजी उत्तरप्रदेशमधील लखनऊ येथील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
मुख्य लिपीक वसीम कुरेशी यांनी महापालिकेच्या करसंकलन तसेच माहिती व जनसंपर्क विभागात कार्यरत असताना महत्वपुर्ण जबाबदारी पार पाडली. तसेच समाजात वावरत असताना ते सामाजिक सलोखा जपण्यासाठी सर्व सामाजिक आणि धार्मिक उत्सवांमध्ये हिरिरीने सहभागी होत असत. त्यांच्या निधनामुळे चांगला मित्र, कर्तव्यदक्ष कर्मचारी आणि माणूसकी जपणारा व्यक्ती गमावल्याची भावना त्यांचे मित्र, सहकारी आणि महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यादरम्यान, त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याची भावना आयुक्त सिंह यांनी व्यक्त केली आहे.










