- ठाकरे गटाच्या संतोष सौंदणकरांच नरेंद्र मोदींना जाहीर आमंत्रण..
- शहरातील खड्ड्यांवरून भाजपच्या कारभारावर सोडलं टीकास्र…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ सप्टेंबर २०२४) :- पिंपरी चिंचवड महापालिकेत एकहाती सत्ता असताना भाजपच्या नगरसेवकांनी फक्त पदपथ (footpath) उभारण्यातच धन्यता मांडली. त्याचाच कित्ता आता पालिका प्रशासनदेखील गिरवताना दिसत आहे. कोणतेच काम धड नाही. सर्वत्रच खड्ड्यांचे साम्राज्य बनल्यामुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीचा भकास कारभार चहाटयावर आला आहे. गुरुवारी (दि. २६) रोजी देशाचे पंतप्रधान आणि स्मार्ट सिटीचे जनक नरेंद्र मोदीसाहेब पुण्यात येणार आहेत. त्यांनी काहीसा वेळ काढून पुणे शहराच्या जुळ्या पिंपरी चिंचवड शहराला भेट द्यावी. महागड्या वाहनातून फेरफटका न मारता रिक्षातून विनामुल्य शहरातील खड्डेसफारीचा आनंद घ्यावा. त्यासाठी माझं देशाच्या पंतप्रधान साहेबांना जाहीर आमंत्रण आहे, अशी उपरोधिक टीका शिवसेनेचे (ठाकरे गट) चिंचवड विधानसभा संघटक संतोष सौंदणकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुणे दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रवास मार्गावर असलेल्या खड्ड्यांबाबत राष्ट्रपती कार्यालयाने थेट नाराजी व्यक्त केली होती. आता २६ सप्टेंबर रोजी पुण्यात येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यालाही तोच अनुभव येण्याची दाट शक्यता आहे. पिंपरी चिंचवड शहरात देखील रस्त्यांबाबत तशीच अवस्था आहे. विविध योजनांसाठी सुरू असलेले खोदकाम तसेच पाऊस यामुळे संपूर्ण शहरातील रस्त्यांवर खड्डे पडून रस्त्यांची शब्दश: चाळण झाली आहे. मध्यंतरी पावसाने उघडीप दिलेली असताना देखील खड्डे बुजविण्याची तोंडदेखली कार्यवाही पालिका प्रशासनाने केली. त्यामुळे खड्ड्यांची समस्या जैसे थे आहे. खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत आहेत. नागरिक सातत्याने नाराजी व्यक्त करत असतानाही महापालिकेकडून फारसे प्रयत्न होत नाहीत.
राष्ट्रपतींनी खड्डे बघितले आता पंतप्रधानांनी बघावेत….
शहरातील चौका-चौकात सगळेच रस्ते खड्ड्यात गेले आहेत. ग्रेड सेपरेटरला तळ्याचं स्वरूप येतयं. काही ठिकाणी पाणी तीन तीन तास तुंबत. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या अंगावर हे पाणी उडत नाही, तोपर्यंत रंगपंचमी चालूच असते. त्यामुळे वाहन चालकांची वादावादी होते. पाणी निचरा करण्याबाबतची यंत्रणा सक्षम नाही. पंतप्रधान साहेबांनी पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांची दुर्दशा पहावी. स्वतः स्मार्ट सिटीचा अनुभव घ्यावा. यासाठी माझं खड्डे पाहण्याचं खुलं आमंत्रण स्वीकारून मोदी साहेबांनी शहरात यावं, असं या पत्रकात सौंदणकर यांनी म्हटले आहे.
















