न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सध्याच्या वेळापत्रकानुसार संबंधित भागात एक दिवस पाणीपुरवठा केला जातो. तर दुस-या दिवशी पाणी बंद असते. या दरम्यान, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानेही (एमआयडीसी) गुरुवारी (दि.९) दिवसभर पाणीपुरवठा बंद ठेवला आहे. त्यामुळे शहरातील काही भागात सलग तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे.
महापालिकेने सोमवार (दि.६) पासून दिवसाआड पाणीपुरवठा बंदचे धोरण लागू केले आहे. त्यामुळे शहरातील काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. महापालिका एमआयडीसीकडून ३० एमएलडी पाणी दररोज घेते. ते पाणी शहरातील वेगवेगळ्या भागात पुरविले जाते. हा पुरवठा गुरुवारी (दि.९) बंद राहणार व शुक्रवारी कमी दाबाने होणार आहे. त्यामुळे वेळापत्रकानुसार ज्या भागात पाणीपुरवठा होणार नाही, तेथे पाणी येणार नाही. परिणामी, काही भागात सलग ३ दिवस पाणी येणार नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
तसेच या संदर्भात एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता एस.एस. मलाबारे यांनी सांगितले की, दर गुरुवारी आमचा पुरवठा बंद (शट डाऊन) असतो. पाणीपुरवठा संबंधित कामे एमआयडीसीकडून केले जातात. त्यामुळे गुरुवारचा पाणीपुरवठा बंद ठेवला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम म्हणाले, एमआयडीसीकडून ठराविक भागात पाणीपुरवठा केला जातो. ते प्रमाण खूपच कमी आहे. ज्या ठिकाणी पाणी येणार नाही, तेथे महापालिकेतर्फे वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा केला जाईल. एमआयडीसीचा गुरुवारी पाणीपुरवठा बंद असल्याने त्या भागात कमी पाणी मिळेल. मात्र, तेथे पालिका पाणीपुरवठा विभागाचा पर्याय नागरिकांना उपलब्ध आहे.


















