न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२४) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात “ज्येष्ठ नागरिक भवन” उभारणार असून विविध सोयी सुविधांनी युक्त असे भवन हे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या हक्काचे व्यासपीठ ठरणार असल्याचे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आणि ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त त्यांना शुभेच्छाही दिल्या.
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून दि.१ऑक्टोबर रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आकुर्डी येथील ग.दि.माडगुळकर नाट्यगृह येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, माजी उपमहापौर शैलजा मोरे आदी उपस्थित होते.
आयुक्त सिंह म्हणाले, महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या जेष्ठ नागरिक भवनामध्ये त्यांच्यासाठी भव्य ऑडीटोरियम, सुसज्ज पार्किंग सुविधा, हॉल, ज्येष्ठ नागरिक संघासाठी स्वतंत्र कार्यालय, अशा अनेक सोयीसुविधा या भवनामध्ये नागरिकांसाठी उभारण्यात येणार आहेत. तसेच विविध योजना, उपक्रम, कार्यक्रम आणि जेष्ठ नागरिकांच्या दृष्टीने आवश्यक सर्व पायाभूत सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आयुक्त सिंह पुढे म्हणाले, राज्यशासन आणि महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना सुरु करून प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना अत्यंत महत्वकांशी आहे. ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्यने या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत उपस्थित नागरीकांना जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.













