- जनसंपर्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा – राहुल कोल्हटकर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२४) :- नामोल्लेख करताना चूक केल्याप्रकरणी माहिती व जनसंपर्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, भारतीय स्वातंत्र्य संग्रमातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे कार्य व योगदान केवळ भारत देशासाठी नव्हे, तर जगातील अनेक राष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्या मनपामार्फत ‘स्वच्छता ही सेवा पंधरवडा’ हा उपक्रम राबविणेत आला. त्याबरोबर जयंतीनमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आले, असंही त्यांनी म्हटलं आहे.
याबाबत प्रसिध्दीमाध्यमांना प्रसिध्दीपत्रकाव्दारे मनपा माहिती व जनसंपर्क विभागमार्फत ई-मेलव्दारे माहिती देण्यात आली. यामध्ये अक्षम्य चूक केल्याचे निदर्शनास आले आहे. सदर विभागाने “राष्ट्रपिता महात्मा गांधी” असा नामोल्लेख न करता फक्त महात्मा गांधी नामोल्लेख केलेला दिसतो. महापुरुष व राष्ट्रपुरुष यांचा आदर व सन्मान राखण्याकरिता त्यांचा नामोल्लेख योग्य प्रकारे, त्यांचा आदर आणि सन्मान वाढेल या पध्दतीने केला जातो. ही बाब आपल्या माहिती व जनसंपर्क विभाग व संबधित अधिकारी, कर्मचा-यांना ठाऊक नाही का ? किंवा त्यांच्याकडून जाणिवपूर्वक महापुरुषांचा अवमान व अहवेलना करणेचा प्रयत्न होत आहे का?, असंही त्यांनी म्हटलं आहे.
माहिती व जनसंपर्क विभागाकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत झालेली ही चूक दुर्लक्षित करून चालणार नाही. ही बाब राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर प्रेम करणा-या सर्वांच्या भावना दुखावणारी देखील आहे. त्यामुळे संबधितांवर योग्य ती कारवाई करून त्यांना योग्य समज द्यावी, अन्यथा “सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह” या मार्गाने आपल्याविरुध्द आंदोलन करू, असं राहूल कोल्हटकर यांनी निवेदनात म्हटलं आहे.