- विद्युत रोषणाईने देवीची मंदिरे सजली; भाविकांचीही मांदियाळी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२४) :- शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. तुळजापूरची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी अंबाबाई आणि कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात घटस्थापना झाली आहे. या दोन्ही मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. भाविकांच्या गर्दीने अंबाबाई मंदिराचा परिसर फुलला आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमांना देखील सुरुवात झाली आहे. 9 दिवसाच्या घोर निद्रेनंतर श्री तुळजाभवानी माता आज पहाटे दोन वाजता पलंगावरून सिंहासनावर विराजमान झाली.
सकाळी आभिषेक पुजा करुन दुपारी जिल्हाधिकारी यांच्याहस्ते विधीवत घटस्थापनेने शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात होणार आहे. नाशिकच्या सप्तशृंगी गडावर नवरात्र उत्सवास सुरवात झाली आहे. साडेतीन शक्ती पीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी झाली आहे. सप्तशृंगी देवीला आभूषण चढवले जात आहेत. गडावर देवीच्या पूजा विधीला सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील आई एकविरा देवीचा शारदीय नवरात्र उत्सवाला आज पासून सुरुवात झाली. आजपासून म्हणजेच घटस्थापनेच्या दिवसापासून महानवमी होमापर्यत सर्व धार्मिक विधी परंपरेनुसार विधिवत होणार असून कार्ला गडावरील एकविरा देवीच्या मंदिरात घटस्थापना करण्यात आली आहे. नांदेडच्या माहूर गडावर नवरात्र महोत्सवाला सुरुवात आहे. रेणुका मातेच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. आज सकाळी शासकीय महापूजा पार पडली. दहा वाजता घटस्थापना झाली. पुढील नऊ दिवस गडावर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.