न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२४) :- चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने आजअखेर ५०८ कोटींचा मालमत्ता कर जमा झाला आहे. करसंकलन विभागाने मालमत्ताकरावर पहिल्या तिमाही व दुसऱ्या तिमाहीमध्ये जाहीर केलेल्या विविध सवलतींचा लाभ घेऊन नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा केलेला आहे. परंतु अद्यापि कर न भरलेल्या मालमत्ताधारकांच्या मालमत्ताकरावर १ ऑक्टोबर पासून २ टक्क्यांचे विलंब शुल्क लागू झाले आहे.
सबब, ज्या मालमत्ताधारकांनी अद्यापही आपल्या कराचा भरणा केलेला नाही अशा नागरिकांनी त्वरीत आपल्या कराचा भरणा करुन थकित रकमेवर वाढणारे विलंब शुल्क टाळावे, असे आवाहन कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांच्याकडून करण्यात आले आहे.
चालू आर्थिक वर्षामध्ये शहरातील ६ लाख ३० हजाराहून अधिक मालमत्ताधारकांपैकी आत्तापर्यंत ३ लाख ९० हजार ५७७ मालमत्ताधारकांनी ५०८ कोटींचा कर भरुन ३० कोटी इतक्या रक्कमेच्या सवलतीचा लाभ घेतला आहे. शहरातील एकूण कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांमध्ये ३ लाख ४२ हजार १५२ निवासी मालमत्ताधारकांनी कर भरला आहे. त्यासोबतच, ३२ हजार ३४४ बिगरनिवासी, ८ हजार ७११ मिश्र, २ हजार ९३७ औद्योगिक, २ हजार ६७० मोकळया जमीन अशा मालमत्तांचा समावेश आहे.












