न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२४) :- पिंपरी-चिंचवड शहरात प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने उपद्रव शोध पथकाची नेमणूक केली आहे. त्यासाठी दोन एजन्सींना काम देण्यात आले आहे. या खासगी एजन्सींच्या पथकांकडून दंडातून जमा झालेल्या रक्कमेपैकी ४० टक्के रक्कम महापालिकेकडे जमा केली जाणार आहे.
शहरात प्रदूषण नियंत्रणाकरीता उपद्रव शोध पथकांची नेमणूक करण्यासाठी महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाने निविदा प्रसिद्ध केली होती. त्यासाठी तीन निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी दोन निविदा पात्र ठरल्या. लघुत्तम दर असलेल्या शुभम उद्योग आणि सैनिक इंटेलिजन्स अॅण्ड सिक्युरिटी प्रा. लि. या एजन्सीचे दर एकसमान आहेत. त्यामुळे या दोन्ही एजन्सींना शहराचे दोन भाग करून काम देण्यात आले आहे. त्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे.
शुभम उद्योगकडे ब, ड, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयाचा भाग आणि सैनिक इंटेलिजन्सकडे अ, क, फ आणि ई क्षेत्रीय कार्यालयाचा भाग देण्यात आला आहे. त्या-त्या भागांत संबंधित एजन्सी कारवाई करून दंड वसुल करणार आहे. हे काम ३ वर्षे चालणार आहे. त्या कालावधीत जमा होणार्या ४ कोटी ३४ लाख ४६ हजार ५२५ रुपये रक्कमेपैकी ४० टक्के रक्कम महापालिकेकडे जमा केली जाणार आहे. उर्वरित ६० टक्के रक्कम संबंधित एजन्सी घेणार आहेत. या कामास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.












